इस्लामपूर : ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ आहे यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. परंतु रक्तदान हे स्वेच्छेने करावयाचे असते. कोणी तरी दबाव आणून रक्तदान करण्यास भाग पाडणे याला शिरजोरीच म्हणावी लागेल. असाच प्रकार इस्लामपूर पालिकेत घडला आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर पालिकेने पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. परंतु या शिबिरास पालिकेचे काही कर्मचारी उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या आहेत.याबाबत माहिती अशी, माजी मंत्री व विठ्ठल—रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट पंढरपूरचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. यानिमित्त इस्लामपूर नगरपालिकेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा फतवा काढण्यात आला होता.परंतु या रक्तदान शिबिराकडे काही कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली. अशा कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये रक्तदान शिबिराला अनुपस्थित का राहिला याबाबत मला मंगळवार दि. ८ जुलैरोजी समक्ष भेटून कारण द्यावे, हे कारण असमाधानकारक असल्यास आपणावर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.वास्तविक पाहता रक्तदान हे स्वेच्छेने करावयाचे असते, कोणीही दबाव आणून रक्तदान करण्यास भाग पाडणे चुकीचे आहे, एवढेही पालिका प्रशासनाला समजू नये हेच विशेष. यावर कहर म्हणजे रक्तदानास अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढणे म्हणजे अरेरावीच म्हणावी लागेल. (प्रतिनिधी)
इस्लामपूर पालिकेत कर्मचारी वेठीस..!
By admin | Updated: July 5, 2014 00:01 IST