देशातील अनियंत्रित विमान धावपट्ट्यांची चौकशी, बारामतीतील दुर्घटनेचा लवकरच अहवाल - मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 00:26 IST2026-02-15T00:24:56+5:302026-02-15T00:26:12+5:30
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आले होते. यावेळी ते माध्यमाशी बोलत होते. बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

देशातील अनियंत्रित विमान धावपट्ट्यांची चौकशी, बारामतीतील दुर्घटनेचा लवकरच अहवाल - मुरलीधर मोहोळ
सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर देशातील अनियंत्रित क्लब आणि धावपट्ट्यांची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत अशा अनियंत्रित धावपट्टयांच्या चौकशी डीजीसीकडून सुरू असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगलीत दिली.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आले होते. यावेळी ते माध्यमाशी बोलत होते. बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेबाबत ते म्हणाले की, विमान अपघातानंतर एडीसीएची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. विमानाचा ब्लॅक बाॅक्सही हस्तगत केला आहे. त्याचा डेटा डाऊनलोड करण्याचे काम सुरू आहे. बारामतीची धावपट्टी ही आपल्या विभागाकडे नव्हती. त्या ठिकाणी फ्लाईंग क्लब व प्रशिक्षण केंद्र चालत होते.
गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ती वापरात होती. शरद पवार, अजितदादाही या धावपट्टीचा वापर करत होते. ही घटना का घडली, त्याची कारणे काय याचा खुलासा अहवालानंतर होईल. देशात अनेक ठिकाणी अनियंत्रित धावपट्ट्या आहेत. त्याची माहिती डीजीसीकडून घेतले जात आहे. या धावपट्टीची चौकशी करून भविष्यात अपघाताचे प्रकार घढणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.
अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या घातपाताचा दावा राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावला. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास आपली यंत्रणा करत आहे. त्यामुळे आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा की, बाहेरच्या यंत्रणेवर? चौकशी अहवालानंतरच यावर बोलणे संयुक्तिक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोण काय बोलते, याला अर्थ नाही
अजितदादांच्या विमान अपघातामागे घातपाताची शंका घेतली जात असल्याबाबत मोहोळ म्हणाले की, अजितदादांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अजून डिजीसीचा अधिकृत अहवाल यायचा आहे. त्यामुळे कोण काय सांगते, काय बोलतो, याला अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला. अजितदादांच्या जाण्याचा दुःख असून या घटनेची चौकशी चालू आहे. याच लवकरच अहवाल येईल, असेही स्पष्ट केले.