भिलवडीत होणार स्वतंत्र पोलीस ठाणे

By Admin | Updated: July 31, 2014 00:19 IST2014-07-31T00:17:21+5:302014-07-31T00:19:03+5:30

जागेची निश्चिती : जिल्हा पोलीसप्रमुखांकडून पाहणी

Independent Police Station Thane will be held in Bhilvadi | भिलवडीत होणार स्वतंत्र पोलीस ठाणे

भिलवडीत होणार स्वतंत्र पोलीस ठाणे

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे असणाऱ्या पोलीस दूरक्षेत्राचे रूपांतर स्वतंत्र पोलीस ठाण्यामध्ये गृहखात्याने केल्यानंतर, योग्य जागेअभावी गेली कित्येक वर्षे रखडलेल्या स्वतंत्र पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू करण्यास आज (बुधवारी) मुहूर्त सापडला. येत्या पंधरा दिवसांमध्ये भिलवडी ग्रामपंचायतीच्या लोकनेते बाळासाहेब काका पाटील सांस्कृतिक भवनामध्ये भिलवडीचे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.
भिलवडी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या लहान दोन खोल्यांमध्ये कित्येक वर्षे भिलवडी औटपोस्टचा कारभार सुरू होता. शासनाने १७ गावांसाठी असलेल्या या पोलीस दूरक्षेत्रास नागरिकांच्या मागणीवरून स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जाही दिला. पण योग्य जागा नसल्याने निधी मंजूर होऊनही ठाण्याचे घोंगडे भिजत पडले आहे. गेल्या आठवड्यात भिलवडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकनेते बाळासाहेब काका पाटील सांस्कृतिक भवन दोन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर पोलीस ठाण्यास देण्याबाबत ठराव करून दिल्याने जागेचा प्रश्न तूर्तास तरी मिटला आहे.
आज, बुधवारी दिलीप सावंत, पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. गायकवाड यांनी जागेची पाहणी करून पोलीस ठाण्यास आवश्यक असणाऱ्या निकषांची पूर्तता करून पंधरा दिवसांत स्वतंत्र पोलीस ठाण्याचा कारभार सुरू करणार असल्याचे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये जाहीर केले.
पं. स. सदस्य विजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले. महावीर मद्वाण्णा यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच दादासाहेब चौगुले यांनी आभार मानले. यावेळी आनंदराव मोहिते, सतीश पाटील, मोहन तावदर, विजय पाटील, शरद पाटील, बाबासाहेब मोहिते, बाळासाहेब मोरे, सचिन पाटील, राहुल कांबळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Independent Police Station Thane will be held in Bhilvadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.