बेदाणा निर्मितीचा वाढता खर्च पेलवेना!

By Admin | Updated: March 23, 2015 00:38 IST2015-03-22T23:33:32+5:302015-03-23T00:38:18+5:30

उत्पादक अडचणीत : औषधे, खतांच्या किमती गगनाला; हमी भावाची शेतकऱ्यांची मागणी

Increasing costs of curving production! | बेदाणा निर्मितीचा वाढता खर्च पेलवेना!

बेदाणा निर्मितीचा वाढता खर्च पेलवेना!

संजय माने - टाकळी --निसर्गाचा लहरीपणा, दिवसेंदिवस औषधे व खतांच्या वाढणाऱ्या किमती आणि दलालांकडून होणाऱ्या अडवणुकीने मिरज पूर्व भागासह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. खर्चाच्या तुलनेत योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी बेदाणा निर्मितीकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरामध्ये शेतीऔषधे व खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पर्यायाने द्राक्ष उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली. मात्र बेदाणा व द्राक्ष विक्री दरात वाढ झालेली नाही. बेदाण्याची आवक घटली तरच दर वाढविला जातो. आवक वाढल्यास दलाल दराचा प्रश्न निर्माण करतात. औषधे व खताची दरवाढ ही शासननिर्णयाने होते. ही दरवाढ शेतकरी निमूटपणे स्वीकारतो. पण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा याकडे कोणाचेच लक्ष नसते, ही वस्तुस्थिती आहे. निसर्गाच्या अवकृपेने होणारे नुकसान टाळता येत नसले तरी, बहुतांश वेळा दलालीचा फटका बसतो. नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांचा द्राक्ष असो अथवा अन्य शेतीमाल असो, त्या मालाचा दर साखळी पध्दतीने दलाल ठरवितात. शेतकऱ्यांना हमीभाव देणारी बाजारपेठ नसल्यामुळे दलालांमुळे बेदाण्यास योग्य भाव मिळत नाही. बेदाणा उत्पादनाचा खर्च व आजचा बेदाण्याचे दर पाहता, बेदाणा उत्पादित शेतकऱ्यांना नुकसानीत हा व्यवसाय करावा लागत असल्याने, शासनस्तरावर याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आयात होणाऱ्या औषधांच्या ंिकमतीत २० ते ३० टक्क्याने वाढ झाली आहे. मजुरांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. विक्री केलेल्या बेदाण्याचे पैसे दलालांकडून त्वरित हवे असल्यास, २ टक्के वटाव घेतला जातो. त्यापुढे वटाव कट न करता पैसे पाहिजे असल्यास बेदाणा खरेदीपासून दीड ते दोन महिन्यांनी शेतकऱ्यास दलालाकडून पैसे दिले जातात. दलालांकडून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या या पिळवणुकीची दखल घेऊन मार्केट कमिटीने खरेदी केलेल्या मालाचे पैसे आठ दिवसात देण्याचा ठराव केला आहे. ठराव केला असला तरी, दलालांवर वचक नसल्याने या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. एक किलो बेदाणा बनविण्यास शेतकऱ्यास २५ रूपये, एक एकरास द्राक्ष निर्मितीसाठी लागणाऱ्या औषधांसाठी ४० हजार, मजुरी ६० हजार रुपये, असा एक लाख रुपये खर्च होतो. एकरी अडीच टन बेदाणा प्रक्रियेस मजुरी, प्रक्रियेचे केमिकल्स, वाहतूक, शेड, कोल्ड स्टोअरेज भाडे हा खर्च पाहता, द्राक्षशेती न परवडणारी आहे. बेदाणा उत्पादन हेही बेभरंवशाचे होऊन बसले आहे.
बेदाण्याची आवक वाढल्यास व्यापारी दरात घसरण करतात. उत्पादन घटले, तरच दर वाढवितात. अशी परिस्थिती दरवर्षी ठरलेली असते. अवकाळीमुळे चांगल्या दर्जाच्या बेदाण्याचे प्रमाण घटल्याने सध्या चांगल्या मालाला १५० ते १७५ रुपयांपर्यंत दर आहे. अवकाळीमुळे भिजलेला बेदाणा कवडीमोल किमतीने विकावा लागणार आहे.
एकूण परिस्थिती पाहता, निसर्गाचा फटका आणि दलालांची अडवणूक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी ठरु लागली आहे. यातून बँकेच्या कर्जाचे हप्ते आणि पुढील हंगामाच्या तयारीचे नियोजन करायचे ठरविल्यास शेतकऱ्यास खासगी सावकार व बँकांचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
याची दखल घेऊन शासनाने एक तर औषधे व खतांच्या वाढत्या दरांना लगाम घातला पाहिजे. दरवाढ अटळच असेल, तर दलालांची साखळी तोडून शेतकऱ्यांच्या उत्पादित बेदाण्याला हमीभाव देण्याचे नियोजन केले पाहिजे. अन्यथा भविष्यात शेतकरी द्राक्षशेतीकडे पाठ फिरविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांना हमीभाव देणारी बाजारपेठ अथवा यंत्रणा नसल्याने निर्माण झालेल्या दलालांच्या साखळीमुळे बेदाण्यास योग्य भाव मिळत नाही. बेदाणा उत्पादनाचा खर्च व आजचा बेदाण्याचा दर पाहता, बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीत हा व्यवसाय करावा लागत आहे. शासनस्तरावर याची दखल घेण्याची गरज आहे.

Web Title: Increasing costs of curving production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.