Municipal Council Election Result 2025: सांगली जिल्हाभरात १३६ जणांना अनामत वाचविण्यापुरतीही मते मिळाली नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 18:47 IST2025-12-22T18:45:56+5:302025-12-22T18:47:18+5:30
आष्ट्यात पती-पत्नीला प्रत्येकी ३२ मते

Municipal Council Election Result 2025: सांगली जिल्हाभरात १३६ जणांना अनामत वाचविण्यापुरतीही मते मिळाली नाहीत
सांगली : शिराळा नगर पंचायतीच्या निवडणुकीत तब्बल १७ उमेदवारांची अनामत जप्त झाली. अटीतटीच्या राजकीय संघर्षात त्यांचा सपशेल पराभव झाला. नगराध्यक्षपदाच्या ६ उमेदवारांना, तर नगरसेवकपदाच्या ११ उमेदवारांना अनामत रक्कम जप्तीच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत जोरदार टशन रंगले. नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असलेल्या एका उमेदवाराला अनामत गमवावी लागली. नगरसेवक पदाच्या शर्यतीतील १५ उमेदवारांची अनामत जप्त झाली.
उरुण इस्लामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मात्र तब्बल ३८ जणांना अनामत वाचविण्यापुरीतीही मते मिळवता आली नाहीत. नगराध्यक्षपदासाठी ६ आणि १५ प्रभागांतील ३० जागांसाठी ९४ अशा एकूण १०० उमेदवारांनी निवडणुकीत आपले नशीब आजमावले. त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठी लढलेल्या चौघांना आणि नगरसेवकपदाच्या ३४ अशा एकूण ३८ जणांना अनामत वाचवता आली नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ५, तर नगरसेवक पदाच्या २४ जागांसाठी ८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील नगराध्यक्ष पदाच्या तिघांना अनामत वाचवता आली नाही. नगरसेवक पदाच्या तब्बल ४० उमेदवारांची अनामत जप्त झाली.
पलूसमध्ये नगराध्यक्ष पदाच्या तिघांना व नगरसेवक पदाच्या सातजणांना अनामत वाचविण्यापुरतीही मते मिळविता आली नाहीत. विट्यात नगराध्यक्ष पदाच्या एकाची आणि नगरसेवक पदाच्या दहाजणांची अनामत जप्त झाली.
आष्ट्यात पती-पत्नीला ३२ मते
आष्ट्यात नगरसेवक पदाच्या दोघांची अनामत जप्त झाली. प्रभाग ११ मधून स्वप्ना वाडेकर यांना ३२ आणि त्यांचे पती अनुप वाडेकर यांनाही ३२ मते मिळाली.