Sangli: तीन वर्षीय जिजाने सर केला 'कर्नाळा', अवघ्या एक तास ५४ मिनिटांत केली चढाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:52 IST2025-02-26T13:52:30+5:302025-02-26T13:52:52+5:30
चिमुकलीचे अतुलनीय शौर्य; परिसरात कौतुक

Sangli: तीन वर्षीय जिजाने सर केला 'कर्नाळा', अवघ्या एक तास ५४ मिनिटांत केली चढाई
सहदेव खोत
पुनवत : शिराळे खुर्द ता. शिराळा येथील सागर विश्वास पाटील यांच्या तीन वर्षीय जिजा नावाच्या चिमुकलीने पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ला अवघ्या एक तास ५४ मिनिटांमध्ये चालत चढाई करत सर केला. तिच्या या अतुलनीय शौर्याचे परिसरात मोठे कौतुक होत आहे.
शिराळे खुर्द येथील सागर विश्वास पाटील हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. ते आपली पत्नी अश्विनी आणि मुलगी जिजा यांच्यासह मुंबईत वास्तव्यास आहेत. सागर पाटील दरवर्षी आपल्या मुलीचा वाढदिवस गडकिल्ल्यावर जाऊन साजरा करतात. यानिमित्ताने ते आपल्या मुलीला गड किल्ल्यांची माहिती देतात. शनिवारी (दि.२२) सकाळी दहा वाजता सागर आपल्या पत्नी आणि मुलीसह कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. तेथून या तीन वर्षाची चिमुकलीसह त्यांनी कर्नाळा किल्ल्याची चढाई सुरू केली.
जिजा मोठ्या उत्साहाने गड चढत होती. अडचणीची वाट, तीव्र चढण, धोकादायक परिसर असूनही ती अत्यंत धैर्याने गड सर करत होती. एक तास ५४ मिनिटांचा वेळ घेत तिने पायी चालत हा गड सर केला. तिचे हे अतुलनीय शौर्य पाहून अनेक ट्रेकर्सनी तिचे अभिनंदन केले. काहींनी तर तिच्या चढाईची रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल केली. कोणतेही प्रशिक्षण नसताना अगदी कमी वयात कर्नाळा किल्ला तिने सर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जिजाला लहान वयापासूनच गड किल्ल्यांची आवड निर्माण झाली असून तिने अनेक किल्ल्यांवर भ्रमंती केली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील ही मुलगी लहान वयापासूनच ट्रेकिंग करत लक्षवेधक कामगिरी करत आहे त्यामुळे शिराळा तालुक्यात तिचे कौतुक होत आहे.