नातेवाईकांना भेटून घरी परतणाऱ्या बापलेकीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 12:03 IST2025-02-23T12:03:20+5:302025-02-23T12:03:46+5:30
सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आले

नातेवाईकांना भेटून घरी परतणाऱ्या बापलेकीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
विठ्ठल ऐनापुरे
जत - कर्नाटकातील अनंतपूर ते डफळापूर मार्गावरील सीमेवर दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने ठोकरल्याने जत तालुक्यातील मेंढीगिरी येथील वडील व मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. मेंढीगिरी येथील रामू कुरणे (वय ५५) व मुलगी जान्हवी रामू कुरणे (वय १५) या दोघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. कर्नाटकातील अथणी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
रामू कुरणे हे मुलगी जान्हवीसह नातेवाईकांकडे शनिवारी दुचाकीवरून गेले होते. नातेवाईकांना भेटल्यानंतर सायंकाळी अनंतपूर ते डफळापूर मार्गे जतकडे येत होते. सायंकाळी साडे सातच्या सुमारास कर्नाटकातील अनंतपूर हद्दीत अज्ञात वाहनाने कुरणे यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर वाहन चालकाने तेथून पळ काढला. धडकेत रामू कुरणे व मुलगी जान्हवी हे दोघेजण गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले.
या दोघांना अथणीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह मेंढीगिरी गावी आणण्यात आला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आले. या अपघाताची नोंद अथणी पोलिस ठाण्यात झाली आहे. रामू कुरणे हे फोटोग्राफर म्हणून कार्यरत होते. बापलेकीच्या दुर्दैवी मृत्यूने मेंढीगिरी परिसरावर शोककळा पसरली आहे.