कारवाई कराल तर सांगली बंद !
By Admin | Updated: July 4, 2014 00:47 IST2014-07-04T00:41:24+5:302014-07-04T00:47:24+5:30
व्यापाऱ्यांच्या कृती समितीचा इशारा : एलबीटी सुनावणीवरही बहिष्कार

कारवाई कराल तर सांगली बंद !
सांगली : महापालिकेकडून एलबीटीबाबत व्यापाऱ्यांना लुटारूंची वागणूक दिली जात आहे. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पालिकेचे अधिकारी नोटिसा बजावत आहेत. एलटीबीसाठी व्यापाऱ्यांवर कारवाई झाली तर ‘सांगली बंद’ करू, असा इशारा कृती समितीने आज, गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला. येत्या १७ जुलैला होणाऱ्या एलबीटी सुनावणीवरही बहिष्कार टाकणार असल्याचे समितीने सांगितले.
महापालिकेने काल एलबीटी न भरणाऱ्या पाचशे व्यापाऱ्यांना फौजदारीची नोटीस बजाविली आहे. या नोटिशीला प्रत्युत्तर देताना कृती समितीचे समीर शहा, धीरेन शहा, आप्पा कोरे, गौरव शेडजी, सुदर्शन माने यांनी संयुक्त पत्रकार बैठकीत महापालिका आयुक्तांवर टीकास्त्र सोडले. समीर शहा म्हणाले की, पालिकेने व्यापाऱ्यांना गुन्हेगार ठरवून फौजदारीच्या नोटिसा बजावल्या आहेत. केवळ व्यापारीच नव्हे, तर दुकानातील व्यवस्थापक, कामगारांचाही त्यात समावेश केला आहे. त्यातील भाषा पालिकेला न शोभणारी आहे. आम्हाला लुटारूंप्रमाणे वागणूक दिली जात आहे. एकीकडे शासनस्तरावर एलबीटी रद्द करण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे आयुक्तांना कारवाईची घाई झाली आहे. शहरातील एकाही व्यापाऱ्यावर कारवाई झाली तर सांगली बंद करू. पालिकेने नोटिशीवर १७ जुलैला सुनावणी ठेवली आहे. त्याला एकही व्यापारी उपस्थित राहणार नाही. व्यापाऱ्यांनी वर्षभरात एलबीटीचे ६० कोटी जमा करून घेतल्याचे आयुक्तांचे म्हणणे हास्यास्पद आहे. ग्राहकांकडून एलबीटी वसूल केला असता तर शहरातील बाजारपेठ बकाल झाली असती. एलबीटी रद्द झाल्यानंतर पालिकेचा थकीत कर आमच्या खिशातून एकरकमी भरण्याची तयारी दर्शवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनंत चिमड, प्रसाद कागवाडे, सोमेश बाफना, सुरेश पटेल उपस्थित होते. (प्रतिनिधी)