कोल्हापूर : घरात अथवा परिसरात आलेला नाग, साप मारून त्याची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्या संशयितांवर आता वन विभागासह प्राणीमित्रांची करडी नजर आहे. जर तुम्हाला साप मारुन त्याचा व्हिडीओ करायचा मोह आवरला नाही तर मात्र तुम्हाला पोलीस कोठडीत जावे लागणार आहे.गेल्या चार दिवसांपासून उदगीर (लातूर) येथील एका संशयिताने साप मारून त्याची चित्रफित सोशल मीडियावरून व्हायरल केल्याप्रकरणी लातूर वन विभागाने एकाविरोधात कारवाई केली. याप्रकरणी सांगलीतील प्राणीमित्र ॲड. बसवराज होसगौडर यांनी व्हिडीओ जारी करणाऱ्यांचा शोध घेऊन तक्रार दाखल केली होती.एका संशयिताने साप मारून त्याची चित्रफित सोशल मीडियावरून व्हायरल केली. हे चित्रिकरण राज्यासह देशभरात व्हायरल झाले होते. सांगलीतील प्राणीमित्र ॲड. बसवराज होसगौडर यांनीही ती पोस्ट पाहिली. त्यांनी पिपल्स फॉर ॲनिमलच्या इतर कार्यकर्त्यांकडून माहिती घेत संशयिताचे नाव व पत्ता शोधून काढला. तर तो उदगीर (लातूर) येथील असल्याचे समजले. त्यांनी तातडीने लातूर वन विभागाशी संपर्क साधत त्याच्यावर कारवाईसाठी तक्रार दिली. त्यानुसार वनपाल टी. बी. वंजे यांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली.
राज्यात अशाप्रकारे साप, नाग, वन्य पशू, पक्षी आणि पाळीव प्राण्यांना मारून त्याचे चित्रिकरण सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांवर वन्यजीव कायद्यानुसार कारवाई करता येते. अशाप्रकारे प्राण्यांची हत्या करणाऱ्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये तीन ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा व १० ते २५ हजारांचा दंडही होऊ शकतो.- ॲड. बसवराज होसगौडर,प्राणीमित्र, सांगली