मी संसदेत बोलणारा खासदार; अधिकारी, मंत्रीही मला घाबरतात - विशाल पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:56 IST2025-11-10T15:55:51+5:302025-11-10T15:56:32+5:30
मी कोणाशीही तडजोड केलेली नाही

मी संसदेत बोलणारा खासदार; अधिकारी, मंत्रीही मला घाबरतात - विशाल पाटील
मिरज : मी पालकमंत्र्यांसोबत दिसल्याने काहीजण टीका करतात, मात्र जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या त्यांच्या हातात असल्याने त्यांच्यासोबत जावे लागते. लोकसभेत मी सर्वांत जास्त बोलणारा खासदार असल्याने अधिकारी व मंत्री मला घाबरतात असाही दावा खासदार विशाल पाटील यांनी केला.
मिरजेत वेताळबानगर येथील एका कार्यक्रमावेळी खासदार विशाल पाटील बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, दररोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसता म्हणून काहीजण माझ्यावर टीका करतात, मात्र जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या पालकमंत्र्यांच्या हातात असल्याने त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ल्या हातात येणार नाहीत.
खासदार पाटील म्हणाले, मी विरोधात असूनही मला कामासाठी मुख्यमंत्री व मंत्र्यांकडे जावे लागणार, मला निवडून दिलेल्या लोकांची कामे करण्यासाठी असताना जिथे जावे लागेल तिथे मी जाणार असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले. मी अपक्ष असलो तरी लोकसभेत सर्वांत जास्त बोलणारा खासदार असल्याने अधिकारी व मंत्री लोक मला घाबरतात त्यामुळे मला विकासकामांसाठी पैसे मिळतात, असेही त्यांनी सांगितले.
मी कोणाशीही तडजोड केलेली नाही
भाजप आमदारांसोबत माझा राजकीय वैचारिक वाद असला तरी विकासकामांबाबतीत दोन्ही आमदारांना सोबत घेऊन काम करीत आहे. मात्र, मी माझ्या विचाराशी ठाम आहे. निवडून आल्यानंतर मी सत्तेत गेलो नसलो तरी सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र काम करावे लागते. मात्र, मी कोणाशीही तडजोड केलेली नाही, असा खुलासा विशाल पाटील यांनी केला.