जत शहरात माॅर्निंग वॉकवेळी ट्रकने ठोकलं; पती ठार, पत्नी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 19:17 IST2023-04-28T19:16:19+5:302023-04-28T19:17:16+5:30
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते पत्नीसह फिरायला घराबाहेर पडले.

जत शहरात माॅर्निंग वॉकवेळी ट्रकने ठोकलं; पती ठार, पत्नी जखमी
जत : जतमधील विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी फिरायला गेलेल्या दाम्पत्यास मालवाहतूक ट्रकने दिलेल्या धडकेत पती जागीच ठार झाला, तर पत्नी किरकोळ जखमी झाली. सतीश गेनाप्पा शिंदे (वय ३१, रा. सातारा रोड, जत) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी पावणेसहा वाजता घडली.
जतमधील सातारा रोड येथे सतीश शिंदे कुटुंबासह राहत होते. त्यांचा कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते पत्नीसह फिरायला घराबाहेर पडले. शहरातील विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरून तांबोळी हॉस्पिटलसमोरून ते जात होते, यावेळी विजापूरहून साताऱ्याच्या दिशेने वेगाने निघालेल्या मालवाहतूक ट्रकने शिंदे दाम्पत्यास जोराची धडक दिली. यात जोराचा मार लागल्याने सतीश गंभीर जखमी झाले, तर त्यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या. अपघाताची घटना समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सतीश यांना जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शिंदे यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने जतमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.