सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो महिलांची ८६ लाखांची फसवणूक, गृहोद्योग कंपनीच्या संचालकांचा पोबारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:41 IST2024-12-23T13:40:33+5:302024-12-23T13:41:19+5:30

धाराशिव जिल्ह्यातील दाम्पत्य

Hundreds of women in Sangli and Kolhapur districts cheated of Rs 86 lakhs, director of home industry company arrested | सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो महिलांची ८६ लाखांची फसवणूक, गृहोद्योग कंपनीच्या संचालकांचा पोबारा

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो महिलांची ८६ लाखांची फसवणूक, गृहोद्योग कंपनीच्या संचालकांचा पोबारा

सांगली : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेकडो महिलांना गंडा घालून एका गृहोद्योग कंपनीने फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. गुरुकृपा महिला गृह उद्योग कंपनी असे तिचे नाव असून दोघा संचालकावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

धाराशिव जिल्ह्यातील एका या कंपनीच्या नावावर ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर (वय ३१, सध्या रा. रामकृष्ण परमहंस सोसायटी, १०० फुटी रस्ता, सांगली, मुळ रा. कास्ती खुर्द, ता. लोहारा, जि. धाराशिव) आणि त्याची पत्नी कविता लक्ष्मण बंडगर उर्फ कविता राजकुमार शिंदे (वय २५, मुळ रा. सोन्याळ, ता. जत, जि. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात चंद्रकांत महादेव कडोले (वय ५९, रा. प्रगती कॉलनी, सांगली) यांनी पोलिसांत धाव घेतली.

बंडगर दाम्पत्याने सांगलीत काही महिन्यांपूर्वी गुरुकृपा महिला गृह उद्योग नावाने कंपनी सुरू केली होती. सांगली, मिरज, तासगाव, पलूस तालुक्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांत कंपनीचे ग्राहक तयार केले. सुमारे दीड ते दोन हजार लोकांना सभासद करून घेतले. सभासद होण्यासाठी महिलांकडून १० हजार रुपये अनामत भरून घेतली. त्यातून त्यांना चटणी पँकिंग करण्याचे काम देण्यात आले होते.

काही दिवसांनी हे काम बंद करून उद्योगाने अचानकपणे गाशा गुंडाळला. हे लक्षात येताच पैसे भरलेल्या सभासद महिलांनी अनामतीची १० हजार रुपये रक्कम परत करण्यासाठी बंडगर दाम्पत्याकडे तगादा लावला. पण सध्या दोघेही ८६ लाख २८ हजार ५०० रुपये घेऊन गायब झाले आहेत. त्यांनी सभासद महिलांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

चार पैसे मिळविण्याच्या प्रयत्नात..

घर सांभाळतानाच छोटा-मोठा व्यवसाय करुन चार पैसे मिळवावेत आणि संसाराला हातभार लावा अशी मनीषा बाळगून महिलांनी पैसे गुंतविले. बंडगर दांपत्याने त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक केली. पोलिसांनी संशयितांना पकडले, तरी महिलांचे पैसे परत मिळणार का? असा सवाल फसवणूक झालेल्या महिलांमधून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Hundreds of women in Sangli and Kolhapur districts cheated of Rs 86 lakhs, director of home industry company arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.