आॅक्टोबर छाटणीची तासगावात लगबग
By Admin | Updated: September 15, 2014 23:56 IST2014-09-15T23:54:45+5:302014-09-15T23:56:12+5:30
आगाप छाटण्या सुरूच : चांगल्या दरासाठी प्रयत्न

आॅक्टोबर छाटणीची तासगावात लगबग
अमित काळे - तासगाव --द्राक्षपंढरी असणाऱ्या तासगाव तालुक्यात आता आॅक्टोबर छाटणीची लगबग सुरू झाली आहे. काही ठिकाणी आगाप छाटण्याही घेण्यात येत असल्याचे चित्र आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने द्राक्षबागायतदारांत समाधानाचे वातावरण आहे.
द्राक्षाच्या एकूण कार्यक्रमामध्ये आॅक्टोबर छाटणी हा महत्त्वाचा टप्पा आहे. छाटणीनंतर थेट फुलोरा तयार होऊन द्राक्षमणी तयार होण्यास सुरुवात होत असते. येथून पुढचा काळ हा द्राक्षबागेसाठी महत्त्वाचा असतो. छाटणीचा हंगाम अगदी नोव्हेंबरपर्यंत असला तरी, आगाप छाटण्या घेऊन द्राक्षे लवकर बाजारात आली पाहिजेत, या उद्देशाने लवकर छाटण्या घेण्यावर काही बागायतदारांचा भर असतो.
बाजारात लवकर द्राक्षे आली की, द्राक्षाला चांगला दर मिळतो. हा दर पदरात पाडून घेण्यासाठी बागायतदार नवनवीन प्रयोगही करीत असतात. आगाप छाटण्या घेणारे बागायतदार १५ आॅगस्टपासूनही तयार असतात. किरकोळ प्रमाणात या छाटण्या घेण्याचे काम सुरू आहे. छोट्या बागायतदाराला ते शक्यही आहे.
तालुक्यात अलीकडच्या काळात वेगाने वाढणारे द्राक्षबागेचे क्षेत्र निसर्गाच्या लहरीपणामुळे कमी झाले आहे. नवा शेतकरी, बागायती शेती करताना उसाला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. तरीही मूळचेच मोठे क्षेत्र असणारा तासगाव तालुका आहे. सुमारे १८ ते २० हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्र केवळ द्राक्षबागेचे आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने विहिरी, कूपनलिका, ओढे, ओढ्यांवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पाणी कमी पडणारही नाही. छाटण्या करण्यासाठी आधी द्यायची खते, पाला काढणे, मजुरांची जुळवाजुळव करणे या कामाला बागायतदार लागला आहे.