चाँद उर्दू हायस्कूलच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा घरोघरी शाळा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:56+5:302021-08-15T04:26:56+5:30
मिरज : मिरजेत चाँद उर्दू हायस्कूलच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने घरोघरी शाळा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. दुसरी ते दहावीच्या ...

चाँद उर्दू हायस्कूलच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा घरोघरी शाळा उपक्रम
मिरज : मिरजेत चाँद उर्दू हायस्कूलच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने घरोघरी शाळा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतर्फे १ ते १४ ऑगस्टदरम्यान सेतू अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू करण्यात आला. मात्र, ऑनलाईन तासाला सर्व विद्यार्थी उपस्थित राहात नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीच्या कारणांचा शोध घेण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, रेंज नाही, दोन-तीन अपत्यांना मोबाईल देणे पालकांना शक्य होत नाही. अशा कारणाने विद्यार्थी ऑनलाईन तासाला अनुपस्थित असल्याचे आढळले. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी पोहाेचू शकत नसल्याने माजी विद्यार्थी व नववी- दहावीतील हुशार विद्यार्थ्यांच्या मदतीने घराघरांत शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला. नववी-दहावीतील हुशार विद्यार्थ्यांनी दररोज दोन तास शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला. यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून लांब असलेले विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले.
या उपक्रमात सहभागी सानिया इनामदार, नाजनीन पटेल, सबिया सौदागर, सबा देसाई, मेहेक मुश्रीफ, जन्नत काजी, फिरदोस मोमीन, आफिया आगलावणे, जाहिद खतिब, आफीयी गोदड या विद्यार्थिंनीचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळा सुरू होईपर्यंत दररोज अध्यापनाचे काम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका तबस्सुम पालेगार व शिक्षकांनी संयोजन केले.