मूठभर मराठा सत्ताधाऱ्यांनीच मराठा समाजाला गरीब ठेवले : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 08:33 PM2018-08-04T20:33:09+5:302018-08-04T20:33:45+5:30

A handful of Maratha rulers kept the Maratha community poor: Sadabhau Khot | मूठभर मराठा सत्ताधाऱ्यांनीच मराठा समाजाला गरीब ठेवले : सदाभाऊ खोत

मूठभर मराठा सत्ताधाऱ्यांनीच मराठा समाजाला गरीब ठेवले : सदाभाऊ खोत

Next
ठळक मुद्देआंदोलनाच्या आडून कॉँग्रेस-राष्टवादी स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत.

इस्लामपूर : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील बनला आहे. आरक्षण मिळावे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. राज्यात-देशात काही मूठभर मराठा घराण्यांच्या हाती सत्ता होती, त्यावेळी त्यांनी न्याय दिला नाही. मराठा समाजाला जाणीवपूर्वक गरीब ठेवण्याचे काम याच मराठा संस्थानिकांनी केले, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी केली.

आरक्षणापासून वंचित असणाºयांच्या पाठीशी सरकार आहे. त्यामुळे आरक्षण प्रक्रियेत मराठा समाजाने सहभागी होताना आत्महत्या किंवा हिंसक मार्गाचा स्वीकार करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

इस्लामपूर येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पूर्वीच्या आघाडी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाता-जाता अध्यादेशाद्वारे दिलेले आरक्षण टिकणार नाही, याची माहिती त्यांना होती. त्यांना आरक्षण द्यायचे होते तर सभागृहात विधेयक का आणले नाही? त्याउलट मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात विधेयक मांडून त्याला मंजुरी घेतली. त्यालाही न्यायालयात स्थगिती मिळाली. पुन्हा गुणवत्तेवर आरक्षण देण्याची माहिती न्यायालयात सादर करून मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली.

खोत म्हणाले, या आयोगाने आतापर्यंत राज्यातील १ लाख ८६ हजार नागरिकांच्या साक्षी नोंदवत लेखी निवेदनेही घेतली आहेत. सॅँपल सर्व्हे सादर झाला आहे. तज्ज्ञांच्या समितीमार्फत या साक्षी व निवेदनांची छाननी करून त्याचा अहवाल आयोगाकडून सरकारला सादर होईल. राज्यातला शेतकरी हा कुणबीच आहे. त्यासाठी शिवकालीन काळापासूनचे पुरावे जमा केले आहेत. मराठा समाजाला कायदेशीरपणे टिकणारे आरक्षण देण्याबाबत गतीने काम सुरू आहे. मराठा समाजाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे. आत्महत्या करणे अथवा हिंसक मार्ग स्वीकारू नये. आंदोलनाच्या आडून कॉँग्रेस-राष्टवादी स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत.

मराठा समाजातील संस्थानिक नेत्यांनी सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवून समाजाला नागवले, वेठीस धरले. चारी बाजूंनी समाजाची कोंडी केली. स्वत: सत्ता भोगताना समाजाला मात्र जाणीवपूर्वक गरीब ठेवले. सत्तेवरून घालवल्यानंतर त्यांनी श्रावण बाळाचा अवतार घेतला आहे. ते आता कावड घेऊन काशीला निघाले आहेत, असा टोला सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना मारला.यावेळी पं. स. सदस्य राहुल महाडिक, विकास आघाडीचे नेते विक्रम पाटील, माजी जि. प. सदस्य सम्राट महाडिक, जि. प. सदस्य जगन्नाथ माळी, अ‍ॅड. पोपट पवार उपस्थित होते.

Web Title: A handful of Maratha rulers kept the Maratha community poor: Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.