‘एच३ एन२’ने चिंता वाढविली, सांगली जिल्ह्यात पाच रुग्ण आढळल्याने धाकधूक, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 15:32 IST2023-03-17T15:31:31+5:302023-03-17T15:32:02+5:30
सर्दी, खोकला काळजी घ्या

‘एच३ एन२’ने चिंता वाढविली, सांगली जिल्ह्यात पाच रुग्ण आढळल्याने धाकधूक, पण...
सांगली : राज्यात ‘एच३ एन२’ने चिंता वाढविली आहे. रुग्णांची संख्या सर्वत्र वाढू लागली आहे. सांगली जिल्ह्यातही पाच रुग्ण आढळल्याने धाकधूक वाढली आहे. अर्थात, ते सर्वजण बरे झाले आहेत. सध्या नव्याने एकही रुग्ण जिल्ह्यात अस्तित्वात नाही. योग्य ती काळजी घेतल्यास भीतीचे कारण नाही, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
आठवडाभरात एकही रुग्ण नाही
गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पाच रुग्ण आढळले होते, पण ते उपचारानंतर पूर्ण बरे झाले.
सर्दी, खोकला काळजी घ्या
सर्दी, खोकला असल्यास तर त्वरित उपचार फायद्याचे ठरतात. घरातच थांबून राहण्याने संसर्गाची भीती राहत नाही. बाहेर पडताना मास्क अवश्य वापरावा.
काळजी कोणी घ्यावी?
- ज्येष्ठ, आजारी नागरिक, सतत प्रवास करणारे यांनी काळजी घ्यावी.
- साथ असलेल्या शहरातून प्रवासावेळी मास्कसह अन्य काळजी आवश्यक आहे.
- सर्दी, खोकला, ताप, खोकला असणाऱ्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.
मास्क वापरा
- राज्यात ठिकठिकाणी रुग्ण आढळू लागले आहेत, त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरण्याची सवय लावून घ्यावी.
- सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्क आवश्यक आहे. रुग्णालयात रुग्णाला भेटायला जातानाही मास्क वापरावा.
जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण अस्तित्वात नाही. नियमित चाचण्याही सुरू आहेत. यापूर्वी सापडलेले पाच रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. तरीही लोकांनी खबरदारी घ्यावी. - डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्याधिकारी