Sangli: गुढे पाचगणी पठार पर्यटकांना खुणावतोय, निसर्गसौंदर्याची भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 17:24 IST2024-09-20T17:22:54+5:302024-09-20T17:24:23+5:30
सहदेव खोत पुनवत : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात असलेल्या निसर्गरम्य गुढे पाचगणी पठाराचे पर्यटकांमध्ये आकर्षण वाढत आहे. सध्या दिवसेंदिवस ...

Sangli: गुढे पाचगणी पठार पर्यटकांना खुणावतोय, निसर्गसौंदर्याची भुरळ
सहदेव खोत
पुनवत : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात असलेल्या निसर्गरम्य गुढे पाचगणी पठाराचे पर्यटकांमध्ये आकर्षण वाढत आहे. सध्या दिवसेंदिवस येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. सुटीच्या दिवशी या परिसरात दूरवरून पर्यटक येत असून येथील वैविध्यपूर्ण दृश्यांचा आनंद लुटत आहेत.
शिराळा तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे गुढे पाचगणीचे पठार चांदोली अभयारण्यालगत आहे. या परिसरात निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. यावर्षीच्या चांगल्या पावसामुळे येथे सुंदर हिरवाई बहरली आहे. विविध प्राणी पक्षांचा वावर, देखणे डोंगर, उताराची शेती, कडेकपारीतील धबधबे, पाणवठे, पठारावरील पवनचक्क्या, घाट रस्ते, अधूनमधून नजरेस भरणारी वैविध्यपूर्ण शेती अन् येथे मिळणारा एकांत, अशा सर्व देणगीमुळे गुढे पाचगणी पठार सर्वांनाच आकर्षित करीत आहे.
सध्या या पठारावर जागोजागी फुलोत्सव सुरू झाला आहे. कास पठाराप्रमाणेमुळे या ठिकाणी विविध जातीची बहुरंगी फुले नजरेस पडत आहेत. त्यामुळेच या परिसराला मिनी महाबळेश्वर संबोधले जात आहे. हे पठार उंचावर असल्याने येथून शिराळा पश्चिम भागातील निसर्ग चांदोली धरणासह अनुभवता येत आहे.
चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, गुढे पाचगणी पठार, उदगिरी पठार ही सर्वच ठिकाणे पश्चिम भागात असून पर्यटकांना एकाच वेळी या ठिकाणांना भेटी देऊन आनंद घेता येत आहे. यामुळे परिसरात गर्दी वाढत आहे.
या पठारावरील निसर्ग पाहिल्यानंतर प्रत्येकाचा आनंद द्विगुणित होत आहे. गुठे पाचगणी परिसर हा शिराळा तालुक्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. वर्षा पर्यटनासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. त्यामुळे येथे दूरवरून पर्यटक येत आहेत. - अशोक जाधव, निसर्गप्रेमी, काष्ठशिल्पकार, चिंचोली