सांगली जिल्ह्यातील जीएसटी घटला, चालू आर्थिक वर्षात प्रथमच आलेख खाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:55 IST2022-08-22T13:45:41+5:302022-08-22T13:55:42+5:30
एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात विक्रमी जीएसटी गोळा झाला असताना जुलैच्या महसुलात अचानक घट नोंदली गेली.

सांगली जिल्ह्यातील जीएसटी घटला, चालू आर्थिक वर्षात प्रथमच आलेख खाली
सांगली : जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात उत्पन्नाचे अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या जीएसटी विभागाच्या जुलैच्या महसुलात ६ टक्क्यांनी घट नोंदली गेली आहे. यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
राज्यभरात अनेक जिल्ह्यांत जुलै महिन्यात महापुराने जनजीवन विस्कळीत झाले. अद्याप अनेक जिल्हे यातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत उद्योग व व्यवसायातील उलाढालही विस्कळीत झाली. तरीही महाराष्ट्रातील जीएसटी संकलन वाढले असताना सांगली जिल्ह्यातील जीएसटी संकलनात घट नोंदली गेली आहे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात विक्रमी जीएसटी गोळा झाला असताना जुलैच्या महसुलात अचानक घट नोंदली गेली.
मागील वर्षी जुलै महिन्यातील करसंकलनाचा विचार केल्यास यंदाच्या जुलैमध्ये ५ कोटी रुपये घट झाली आहे.
करचोरीविरोधात कारवाईचा बडगा
करचोरीविरोधी विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम जीएसटी विभागाने सुरु केली आहे.. त्यामुळे पहिल्या चौमाहीत करसंकलनात वाढ झाल्याचे • दिसून येत आहे. यापुढेही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे विभागाने सांगितले.
महिनानिहाय जीएसटी संकलन, कोटी रु.
महिना २०२१ २०२२
एप्रिल ८४ ११२
मे ५२ १०४
जून ५५ ९४
जुलै ८१ ७६
चौमाहीतील वाढ रु. कोटी
२०२१ - २७६
२०२२ - ३८६
एकूण वाढ - ११३
वाढ टक्के - ४२