महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा आलेख वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:45+5:302021-07-07T04:32:45+5:30
सांगली : जिल्ह्यातील वाळवावगळता इतर तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत असताना महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. गेला आठवडाभर ...

महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा आलेख वाढला
सांगली : जिल्ह्यातील वाळवावगळता इतर तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत असताना महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. गेला आठवडाभर दररोज २००च्या आसपास रुग्ण सापडत आहेत. कोरोना रुग्णांची मृत्यूची टक्केवारी घटल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शहरात कडक निर्बंध लागू असले तरी ते कागदावरच आहेत. दुकानाचे शटर बंद असले तरी पाठीमागील दारातून व्यवसाय सुरू आहे.
जिल्ह्यातील वाळवा, मिरज हे दोन तालुके हाॅटस्पाॅट बनले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून या दोन तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आलेला नव्हता. त्या मानाने इतर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार दिसत आहेत. महापालिका क्षेत्रातील स्थितीही अजून नियंत्रणाखाली नाही. शहरात दररोज पावणे दोनशेच्या पुढे रुग्ण सापडत आहेत. गेल्या दोन दिवसांत तर रुग्णांचा आलेख वाढला आहे. महिनाभराच्या काळात दीडशेपर्यंत असलेली रुग्णसंख्या आता दोनशेच्या घरात पोहोचली आहे.
कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यात अजूनही कडक निर्बंध लागू आहेत. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी मात्र या निर्बंधांना धाब्यावर बसविले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद आहेत. पण ते कागदावरच. बाजारपेठेतील बहुतांश दुकानांतून व्यवसाय सुरू आहे. सकाळपासून या दुकानाबाहेर मालक व कामगार बसून असतात. ग्राहक आल्यास शटर उघडून त्याला आत घेतले जाते आणि नंतर शटर बंद केले जाते. हा प्रकार सर्रास सुरू आहे. कोरोनाच्या काळात अत्यावश्यक कामाव्यक्तिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आदेश असतानाही बाजारपेठेत प्रत्येक दुकानासमोर तीन ते चारजण बसलेले असतात. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. परिणामी शहरातील कोरोना संसर्ग कसा आटोक्यात येईल, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
चौकट
आठवडाभरातील कोरोनाची स्थिती
तारीख सांगली मिरज एकूण मृत्यू
२९ जून १६४ ३१ १९५ ३
३० जून १८४ ६५ २४९ ३
१ जुलै १२१ ६५ १८६ २
२ जुलै १२७ ३० १५७ ३
३ जुलै १५५ ४० १९५ १
४ जुलै १६७ ४१ २०८ ४