द्राक्ष बागायतदार पुन्हा धास्तावले...
By Admin | Updated: November 11, 2014 23:17 IST2014-11-11T22:58:31+5:302014-11-11T23:17:11+5:30
पावसाचा फटका : तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, पलूस तालुक्यातील चित्र; ढगांची गर्दी कायम

द्राक्ष बागायतदार पुन्हा धास्तावले...
तासगाव : तासगाव शहर तसेच तालुक्याच्या बहुतांशी भागात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे. आणखी दोन-तीन दिवस पावसाची शक्यता संकेतस्थळांवर वर्तवण्यात आल्याने चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी रात्री पाऊस झाल्यानंतर आज (मंगळवारी) दिवसभर वातावरण स्वच्छ होते.
फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागांना या अवकाळी पावसाचा जबर फटका बसू शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात छाटण्या घेतलेल्या बागांत सध्या द्राक्षमणी तयार होऊ लागल्याचे चित्र आहे. एकदा द्राक्षमणी ‘सेट’ झाला की वातावरणातील बदलाची फारशी काळजी रहात नाही. परंतु अशा बागांचे प्रमाण किती, यावर एकूण उत्पादन अवलंबून असेल. मागील वर्षी दावण्या रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता. आगाप छाटण्या घेतलेल्या द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले होते. मागील वर्षीचे हे चित्र बघून बऱ्याचशा बागायतदारांनी यावेळी आॅक्टोबर छाटणी आॅक्टोबरमध्येच घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आगाप छाटण्या घेणाऱ्या बागायतदारांचे यंदा प्रमाण तुलनेने कमी आहे.
सोमवारी रात्री झालेला पाऊस फुलोरा स्थितीमधील बागांना नुकसानकारक ठरणार आहे. पावसाने घडात पाणी साचून कूज होते, घडांची गळही होते. याशिवाय या वातावरणात दावण्याचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो. आधीच काही प्रमाणात दावण्या आला आहे. आठवड्याभरापूर्वी जेव्हा तीन दिवस पाऊस बरसला, ढगाळ वातावरण राहिले, तेव्हा दावण्या वाढलेला होता.
सलग तीन दिवस हे वातावरण राहिल्याने बागांवर प्रचंड प्रमाणात औषधांची फवारणी करून दावण्या आटोक्यात आणला गेला. आता सोमवारपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने बागायतदारांची तारांबळ उडाली आहे. सोमवारी रात्री नऊनंतर पावसास सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. परिणामी आज सकाळपासून बागायतदारांनी शेती औषधांच्या दुकानांमध्ये औषध खरेदीसाठी गर्दी केली होती. सध्या औषधांच्या फवारणीशिवाय काहीच पर्याय नाही. त्यामुळे दावण्याचे प्रमाण बघून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधाची मात्रा ठरवून फवारणी सुरू आहे. (वार्ताहर)
कवठेमहांकाळ तालुक्यातही चिंतेचे ढग...
कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागातील द्राक्ष बागायतदारांमध्ये ढगाळ वातावरणामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे. या भागात पंधरा दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणाबरोबर पावसाने थैमान घातले होते. सोमवारी व मंगळवारी पुन्हा ढगाळ वातावरण तसेच पावसाच्या हलक्या सरी आल्याने द्राक्ष बागायतदार चांगलाच हबकला आहे. आता फळकूज होण्याची भीती निर्माण झाली होती. सुमारे सातशे एकर द्राक्षक्षेत्र असलेल्या या पश्चिम भागात याचा फटका सर्व द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. महागडी औषधे तसेच कर्जे काढून द्राक्षबागा जतन करून द्राक्षबागेवर औषध फवारणी केली. पण दावण्याने मात्र चांगलेच थैमान घातले आहे. आता राहिलेल्या पन्नास टक्के बागा वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
सोनी परिसरात ढगाळ हवामान
सोनी : या आठवड्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केल्याने औषधांची फवारणी करून द्राक्षबागेला रोगमुक्त ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पावसाने हजेरी लावल्यास फुलोऱ्यामध्ये असलेल्या द्राक्षबागांचे सर्वात जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांनी हात टेकले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सोनी व परिसरात बागांचे नुकसान झाले असून दावण्याची लागण झाली आहे. त्यातच पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत. मिरज पूर्वमध्ये फुलोऱ्यातील द्राक्षबागा अधिक आहेत. मोबाईल, इंटरनेटमुळे पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज समजत असल्याने अनेक शेतकरी याचा वापर करून द्राक्षबागेवर औषध फवारणीच्या कामाचे नियोजन करीत आहेत.
सोमवारी दिवसभर तासगाव तालुक्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. दिवसाही ढगाळ वातावरण होतेच. रात्री आठनंतर विजांचा कडकडाट व वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. हलक्या सरी कोसळल्या. आज सकाळी वातावरण निवळले, पण उकाडा कायम आहे.