अतिरेकी हल्ल्याचा भाजपकडून तीव्र निषेध, सरकार बदला घेईल : देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 13:54 IST2019-02-15T13:46:52+5:302019-02-15T13:54:11+5:30
काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा केंद्र सरकार निश्चित बदला घेईल. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी भावना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ल्याचा भाजपच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला.

अतिरेकी हल्ल्याचा भाजपकडून तीव्र निषेध, सरकार बदला घेईल : देशमुख
सांगली : काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा केंद्र सरकार निश्चित बदला घेईल. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी भावना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ल्याचा भाजपच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला.
आ. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात भाजप नेत्यांची बैठक झाली. यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला भ्याड आहे. याचा भाजप तीव्र निषेध करत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भाजपसह देशातील सर्व नागरिक आहेत. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. याचा बदला सरकार घेईल.
आ. सुधीर गाडगीळ म्हणाले, पुलवामा येथे जवानांवर झालेला हल्ला निषेधार्र्ह आहे. या भ्याड हल्ल्याचा बदला सरकारने घ्यावा. पाकिस्तान थेट युध्दात भारताला हरवू शकत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे अशाप्रकारे भ्याड हल्ले करून भारतीय सैनिकांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या पाठिंब्याने सुरू आहे. याला भारत चोख उत्तर देईल.
महापौर संगीता खोत म्हणाल्या, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. या हल्ल्याचा निषेध करत आहे. प्रकाश बिरजे म्हणाले, भारताला युध्दात पाकिस्तान हरवू शकत नाही. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांना पाकिस्तान पाठिंबा देऊन भारतात अशांतता माजवण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्जिकल स्ट्राईक करून मोदी सरकार या हल्ल्याचा बदला घेईल.
यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, नगरसेवक शेखर इनामदार, विजय घाडगे, भारती दिगडे, सुब्राव मद्रासी, स्वाती शिंदे, प्रकाश बिरजे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.