गोमेवाडीत अपघात : तीन ठार
By Admin | Updated: July 8, 2014 00:49 IST2014-07-08T00:49:25+5:302014-07-08T00:49:49+5:30
आठ जखमी : कंटेनरची जीपला धडक; मृत शेखरवाडीचे विठ्ठलभक्त

गोमेवाडीत अपघात : तीन ठार
आटपाडी : वाखरी (ता. पंढरपूर) येथे रिंगण सोहळा पाहून परतताना शेखरवाडी (ता. वाळवा) येथील भक्तांची जीप आणि कंटेनरचा रात्री गोमेवाडी (ता. आटपाडी) जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे ठार झाले तर एक महिला आणि लहान मुलासह आठजण गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर करंजे (ता. खानापूर) येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात जीपचा चालक जयवंत ऊर्फ गुंडा बबन लादे (वय २९, रा. शेखरवाडी, ता. वाळवा) हा जागीच ठार झाला. तर तानाजी बाळू माळी
(४०, रा. शेखरवाडी) आणि पांडुरंग डवंग (रा. आरळी, ता. पन्हाळा) या दोघांचा सांगलीला उपचारासाठी नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. पांडुरंग बजरंग कार्इंगडे (वय २९), विशाल रामचंद्र दाभाडे (५५), भानुदास आकाराम कार्इंगडे (४८), नंदकिशोर आकाराम खोत (२१), संजय रंगराव खोत (३६), सुमन दिनकर खोत (४५), दिनकर महादेव खोत (६१) आणि संजोत सावंत (४) अशी जखमींची नावे आहेत.
वाखरी (ता. पंढरपूर) येथे आज (सोमवारी) सायंकाळी चारच्या सुमारास बाजीरावाची विहीर येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला दोन तर तुकोबारायांच्या पालखीला एक अशी तीन रिंगण झाली. हा नयनरम्य सोहळा पाहून शेखरवाडीतील भक्तमंडळी जीपने गावी परत जात होती. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास गोमेवाडीच्या पुढील भिवघाटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चढावर कंटेनर (क्रमांक एमएच ०९, डीए ५६५६) आणि जीप (एमएच १० व्ही. १२६५) यांची जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, कंटेनर रस्त्यावर आडवा झाला तर जीपचा चक्काचूर झाला. अपघाताची घटना समजताच आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस उपनिरीक्षक शेलार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने करंजे (ता. खानापूर) येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. पावसाची रिपरिप आणि अंधारामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. (वार्ताहर)