गोदरेजच्या विषारी बाटल्या उघड्यावर प्रकरण : कौलगेत उचलली, बलगवडेत टाकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 13:31 IST2018-09-06T13:27:33+5:302018-09-06T13:31:33+5:30
कौलगे (ता. तासगाव) येथे शुक्रवारी औषधांच्या कालबाह्य झालेल्या जवळपास ४०० ते ५०० बाटल्या अज्ञाताने फेकल्या होत्या. यासंबंधी कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी होणार असल्याची चाहूल लागताच काही मिनिटात अज्ञातांने त्या बाटल्या गायब केल्या.

गोदरेजच्या विषारी बाटल्या उघड्यावर प्रकरण : कौलगेत उचलली, बलगवडेत टाकली!
तासगाव : कौलगे (ता. तासगाव) येथे शुक्रवारी औषधांच्या कालबाह्य झालेल्या जवळपास ४०० ते ५०० बाटल्या अज्ञाताने फेकल्या होत्या. यासंबंधी कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी होणार असल्याची चाहूल लागताच काही मिनिटात अज्ञातांने त्या बाटल्या गायब केल्या.
कृषी विभागातूनच या कारवाईची माहिती पुरवण्यात आल्याची चर्चा आहे, मात्र बुधवारी कौलगेच्या हद्दीतील या विषारी बाटल्या आता बलगवडे हद्दीत लपवण्याचा प्रयत्न अज्ञाताने केला आहे. मात्र यातील विष कोठे ओतले, हा खरा प्रश्न आहे.
शुक्रवारी रात्री ९ वाजता कृषी विभागाने या ठिकाणचा पंचनामा केला. बाटल्या फेकण्याचे कृत्य कुणाचे आहे हे शोधून काढून दोषींवर व कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. मात्र कृषी विभागातील काही अधिकाºयांचे या संबंधित व्यक्तीशी लागेबांधे असल्याचे बोलले जातेय. हे विष आता बलगवडे हद्दीत टाकत लपविण्याचा प्रयत्न केला आहे.
गोदरेजकडे साठ्याची माहिती मागवली : माळी
गोदरेज कंपनीची विषारी औषधे टाकलेल्या ठिकाणचा पंचनामा आम्ही केला आहे. यासंबंधी तासगाव पोलिसात आम्ही तक्रार दिली आहे. होलसेल व डीलर साठ्याची माहिती आम्हाला द्या, असे पत्र आम्ही कंपनीस पाठवले आहे. माहिती मिळाल्यावर नाव समोर येईल व लवकरच आम्ही त्याच्यावर कारवाई करू, अशी माहिती गुण नियंत्रक चंद्रकांत माळी यांनी दिली.