वाईन पार्कची जागा एमआयडीसीला द्या

By Admin | Updated: July 27, 2014 23:08 IST2014-07-27T22:17:08+5:302014-07-27T23:08:03+5:30

पलूसकरांची मागणी : विकासासाठी तरुणांची धडपड

Give the place of the wine park to the MIDC | वाईन पार्कची जागा एमआयडीसीला द्या

वाईन पार्कची जागा एमआयडीसीला द्या

पलूस : किर्लोस्कर कारखान्यामुळे पलूस व परिसरात उद्योजकतेची गुणवत्ता ठासून भरली आहे. त्यामुळे पलूसची ‘एमआयडीसी’ आज वेगाने प्रगती करीत आहे. अपुऱ्या जागेमुळे या प्रगतीला मर्यादा पडत आहेत. जवळच असणाऱ्या व सध्या बंद असलेल्या ‘कृष्णा वाईन पार्क’मधील प्लॉट पलूसमधील तरुण उद्योजकांना मिळावेत, अशी मागणी येथील तरुणांमधून होत आहे.
पलूस औद्योगिक वसाहतीची स्थापना १९७५ मध्ये झाली. संस्थेने शासनाकडून ३५ एकर जागा खरेदी करून विकास केला. कोणत्याही प्रकारचे शासकीय सहकार्य नसताना किर्लोस्करवाडीच्या किर्लोस्कर उद्योग समूहाच्या पाठबळावर भरभराटीस आली आणि अनेक संकटांवर मात करीत आज प्रगतीपथावर आहे.
किर्लोस्कर कारखान्यातून निवृत्त झालेल्या गुणवंत कामगारांना आपला स्वतंत्र उद्योग सुरू करता यावा, या हेतूने या कामगारांनी येथे प्लॉट घेतले. या कामगारांना किर्लोस्कर उद्योग समूहाने मार्गदर्शनच नव्हे, तर कामसुध्दा दिले. या संधीचे सोने करीत केवळ किर्लोस्कर कारखान्यावर अवलंबून न राहता या कामगारांनी इतर राज्यातूनसुध्दा कामे मिळवली. अनेक उद्योजकांनी स्वतंत्रपणे उद्योग सुरू करून मोठे यश मिळवले आणि उद्योजकतेमध्ये पलूसचे नाव नकाशावर आणले.
शासनानेसुध्दा या औद्योगिक वसाहतीला पुरेशा दाबाने वीज पुरवठा करून सहकार्य केले आहे. पाणी पुरवठा, रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. भारनियमन नसल्याने उद्योजक पूर्ण क्षमतेने उत्पादन घेत आहेत. येथील उद्योजक आणि संस्थेचे मार्गदर्शक विठ्ठलराव येसुगडे यांनी त्यांच्या सहकार्याने वसाहतीचा कायापालट केला आहे. आज या वसाहतीमध्ये एकूण १७0 उद्योग आहेत. पैकी १६७ उद्योग पूर्ण क्षमतेने चालू आहेत. कामगारांची संख्या ४ हजार २00 पर्यंत आहे.
सध्या या वसाहतीमध्ये इंजिनिअरिंग जॉब वर्क, प्लॅस्टिक-रबर, सिमेंट पाईप, फौंड्री उद्योग, केमिकल उद्योग, फॅब्रिकेशन, कास्ट अलायन्स, शूज व अन्य देशपातळीवरील लौकिक प्राप्त केलेले उद्योग येथे आले
आहेत. येथील काही उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे.
आज ही वसाहत प्रगतीपथावर असली तरी, अनेक परदेशी उच्च तंत्रशिक्षण घेतलेले तरुण पलूस एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने आपले उद्योग उभारू शकत नाहीत. या गुणवंत तरुण उद्योजकांना जागेसाठी पर्याय म्हणून पलूसजवळ सांडगेवाडी येथे बंद असलेल्या कृष्णा वाईन पार्कमधील ५0 टक्के प्लॉट मिळावेत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असल्याचे विठ्ठलराव येसुगडे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Give the place of the wine park to the MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.