मिरज मतदारसंघ राष्ट्रवादीला द्या
By Admin | Updated: September 20, 2014 00:26 IST2014-09-19T23:39:19+5:302014-09-20T00:26:36+5:30
जयंत पाटील : होनमोरे यांना राष्ट्रवादीचे बळ

मिरज मतदारसंघ राष्ट्रवादीला द्या
मिरज : मिरजेत राष्ट्रवादीची ताकद असल्याने ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मिरजेत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले. काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे यांनी मेळाव्यास उपस्थित राहून, यापुढे जयंत पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मिरजेतील राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली. ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार आहेत. त्यामुळे कोणीही बंडखोरीचा विचार करू नये. मिरजेत राष्ट्रवादीची चांगली ताकद असल्याने ही जागा राष्ट्रवादीसाठी मागू. मात्र त्या बदल्यात जत किंवा दुसरी जागा सोडण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे विद्यमान आमदार निष्क्रिय आहेत. अजितराव घोरपडेंचे कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज आहेत. स्थानिक परिस्थितीची माहिती काँग्रेस नेतृत्वाला देऊन काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसेल, तर आम्ही राष्ट्रवादीचा समर्थ उमेदवार देऊ, त्यासाठी व्यूहरचना करण्यात आली आहे.
काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब होनमोरे यांनी, राष्ट्रवादी प्रवेशाची किंवा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बंडखोरीची घोषणा केली नाही. मात्र यापुढे जयंत पाटील यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. डॉ. महेश कांबळे, योगेंद्र थोरात, श्रावण माने यांनी उमेदवारीची मागणी केली. प्रमोद इनामदार यांनी होनमोरे यांना उमेदवारी देण्याच्या हालचालीवर टीका करून, यामुळे निष्ठावंतावर अन्याय होणार असल्याचे सांगितले.
जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, इलियास नायकवडी, अभिजित हारगे, संगीता हारगे, सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान उपस्थित होते. (वार्ताहर)