मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी बेडगच्या गीतांजली कणसे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:03+5:302021-07-07T04:34:03+5:30
ओळ : मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी निवडीनंतर गीतांजली कणसे यांचा अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी सत्कार केला. ...

मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी बेडगच्या गीतांजली कणसे बिनविरोध
ओळ : मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी निवडीनंतर गीतांजली कणसे यांचा अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी सत्कार केला. यावेळी सर्व सदस्य उपस्थित हाेते.
फाेटाे : ०६ गीतांजली कणसे
मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी बेडग (ता. मिरज) पंचायत समिती गणाच्या सदस्या गीतांजली कणसे यांची बिनविरोध निवड झाली. बहुमताचे गणित न जमल्याने काँग्रेसने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने कणसे यांची बिनविरोध निवड झाली.
मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया मंगळवारी पार पडली. गतवेळी उपसभापती निवडीत फूट पाडून महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपला धक्का देत अनिल आमटवणे यांच्या माध्यमातून उपसभापतीपद मिळविले होते. आताही भाजपला धक्का देत सभापपतीपद मिळवून सत्तांतर घडविण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न होता. महाविकास आघाडी नेत्यांच्या हालचालीची दखल घेऊन खासदार संजयकाका पाटील हे कणसे यांच्यासाठी पुढाकार घेत मैदानात उतरले. त्यांनी विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, बाजार समितीचे संचालक उमेश पाटील, महेश कणसे यांच्यावर निवडीची जबाबदारी सोपविली. संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने भाजपपासून दुरावलेल्या मालगावच्या शुभांगी सावंत पुन्हा भाजपमध्ये परतल्या. सावंत स्वगृही परतल्याने भाजपचे बहुमताचे गणित जुळून आले. प्रयत्न करूनही भाजपचे सदस्य गळाला लागत नसल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सत्तांतराचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे निवडीवेळी स्पष्ट झाले.
महाविकास आघाडीच्या जयश्री डांगे व भाजपच्या गीतांजली कणसे यांच्यात लढतीची शक्यता वर्तविली जात होती; मात्र बहुमताचे गणित न जुळल्याने महाविकास आघाडीने माघार घेत अर्ज दाखल न करण्याची भूमिका घेतली. भाजपच्या गीतांजली कणसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी कणसे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
खासदार संजयकाका पाटील, प्रभारी मावळते सभापती अनिल आमटवणे, अशोक मोहिते, जिल्हा परिषद सदस्य अरुण राजमाने, विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, दिलीपकुमार पाटील, राहुल सकळे, उमेश पाटील, प्रदीप सावंत यांच्यासह महिला सदस्यांनी निवडीबद्दल गीतांजली कणसे यांचा सत्कार केला.
चौकट
बिनविरोधचा असाही योगायोग
गीतांजली कणसे या पंचायत समितीच्या निवडणुकीत बेडग पंचायत समिती गणातून बिनविरोध निवडून आल्या आहेत. सभापती निवडीतही त्यांचा बिनविरोध निवडीचा योगायोग जमून आल्याने कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.