साहेब.. तुम्ही सगळीकडे फिरता, सॅनिटायझर वापरा; चिमुकलीने दिला मंत्री जयंत पाटलांना सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 14:39 IST2022-01-10T13:53:03+5:302022-01-10T14:39:23+5:30
सॅनिटाझर घ्या... मास्कचा वापर करा... काळजी घ्या,’ असा प्रेमळ सल्ला पालकमंत्री जयंत पाटील यांना गोटखिंडी येथील अंगणवाडीतील बालिका अर्षला सलमान पठाण हिने दिला.

साहेब.. तुम्ही सगळीकडे फिरता, सॅनिटायझर वापरा; चिमुकलीने दिला मंत्री जयंत पाटलांना सल्ला
गोटखिंडी : ‘साहेब तुम्ही सगळीकडे फिरत असता... तुम्ही आमच्या शाळेत आला आहात... आत येताना हातावर सॅनिटाझर घ्या... मास्कचा वापर करा... काळजी घ्या,’ असा प्रेमळ सल्ला पालकमंत्री जयंत पाटील यांना गोटखिंडी येथील अंगणवाडीतील बालिका अर्षला सलमान पठाण हिने दिला.
गोटखिंडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळा नंबर एकमधील स्काऊट गाईड पथकाच्या कब विद्यार्थ्यांनी मंत्री पाटील यांचे स्वागत करत सॅल्यूट दिला. तर अर्षला पठाण हिने काैतुकाचा सल्ला देत मंत्री पाटील यांच्या हातावर सॅनिटायझर दिले.
मंत्री पाटील म्हणाले, गोटखिंडीतील बुजूर्ग मंडळीनी पूर्वी प्राथमिक शाळांसाठी भरपूर जागेची व्यवस्था केली आहे. आगामी काळात खुली मैदाने विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
जिल्हा परिषद सदस्या राजश्री एटम, पंचायत समिती उपसभापती नेताजी पाटील, सदस्य आनंदराव पाटील, सरपंच विजय लोंढे, राजारामबापू दूध संघाचे संचालक धैर्यशील थोरात, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारे, आष्टा अप्पर तहसीलदार धनश्री भांबुरे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंदराव टिबे यांनी केले.