परिस्थितीवर मात करीत गावडे बंधू बनले पोलीस!
By Admin | Updated: August 1, 2014 23:20 IST2014-08-01T23:04:12+5:302014-08-01T23:20:39+5:30
सिध्देवाडीकरांना अभिमान : जिद्द, परिश्रमाचे फळ

परिस्थितीवर मात करीत गावडे बंधू बनले पोलीस!
मालगाव : सिध्देवाडी (ता. मिरज) येथील राजेंद्र गावडे व चंद्रकांत गावडे ही सख्खी भावंडं परिस्थितीवर मात करीत राज्य पोलीस दलाच्या सेवेत भरती झाली आहेत. जिद्द व परिश्रमाच्या बळावर त्यांनी मिळविलेले यश आदर्शवत आहे. येत्या महिन्याभरात ते सेवेत दाखल होणार आहेत.
सिध्देवाडी येथील हरिबा गावडे यांना अरविंद, राजेंद्र व चंद्रकांत अशी तीन मुले आहेत. घरची परिस्थिती तशी हाताच्या मनगटावर अवलंबून असलेली. वडील हरिबा गावडे यांनी पडेल ते कष्ट घेऊन मुलांना शिक्षण देण्याची जिद्द बाळगली होती. त्यापध्दतीने त्यांनी थोरला मुलगा अरविंद यांना डी. एड्. या शिक्षकी पेशाचे शिक्षण दिले. अरविंद गावडे यांना सांगली येथील खासगी शिक्षण संस्थेत तातडीने शिक्षकाची नोकरीही मिळाली. प्रश्न उरला तो राजेंद्र व चंद्रकांत या दोन मुलांच्या शिक्षणाचा. त्यासाठीही त्यांनी कष्ट घेतले.
या काळातच त्यांचे निधन झाले आणि या दोन भावंडांच्या शिक्षणाचा भार थोरला भाऊ अरविंद यांच्यावर पडला. वडिलांची जिद्द पूर्ण करण्यासाठी थोरला भाऊ अरविंद यांनी दोन भावांच्या शिक्षणाचा भार पेलला. राजेंद्रचे १२ वीपर्यंत शिक्षण झाले आहे, तर लहान भाऊ चंद्रकांतने डी.एड्.चे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, नोकरीसाठी प्रयत्न सुरुच ठेवले. थोरला भाऊ अरविंद यांनी राजेंद्रला शेतीसाठी द्राक्षबाग घालून दिली.
लहान भाऊ चंद्रकांतही नोकरीच्या शोधात होता. नोकरीसाठी प्रयत्न करुनही ती मिळत नसल्याने चंद्रकांतने शिक्षक होण्याचा नाद सोडून पोलीस भरती व्हायचेच, अशी जिद्द बाळगली. दरम्यानच्या काळात राजेंद्र पोलीस दलात भरती होण्याच्यादृष्टीने शेती पहात गृहरक्षक दलात (होमगार्ड) सहभागी झाला. थोरला बंधू अरविंद यांची मोलाची साथ लाभल्याने राजेंद्र व चंद्रकांत या दोन सख्ख्या भावांनी पोलीस दलात भरती होण्यासाठी परिश्रम घेण्यास सुरुवात केली. प्रथम लहान भाऊ चंद्रकांत पोलीसात भरती झाला, तर गृहरक्षक दलात पोलीस भरतीसाठी राखीव असलेल्या जागेचा राजेंद्रला फायदा झाला.
गावडे बंधूंनी जिद्दीला परिश्रमाचे बळ दिल्यानंतर यश दूर नसते, हा आदर्श आजच्या युवापिढीपुढे ठेवला आहे. राजेंद्र व चंद्रकांतने आपल्या जीवनात परिवर्तन घडविण्यात वडील हरिबा गावडे, आई आक्काताई व थोरले बंधू अरविंद गावडे यांचे श्रेय असल्याचे सांगितले. (वार्ताहर)