सांगलीतील सावळज परिसरात गव्याचा धुमाकूळ, नागरिकात घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 14:46 IST2023-03-11T14:44:16+5:302023-03-11T14:46:02+5:30
वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी सावळजकडे रवाना

सांगलीतील सावळज परिसरात गव्याचा धुमाकूळ, नागरिकात घबराट
दत्ता पाटील
तासगाव : गेल्या काही दिवसापासून दुष्काळी भागात दर्शन देणारा गवा आज सकाळी (शनिवार) सावळज गावामध्ये ग्रामस्थांना पाहायला मिळाला. सिद्धेवाडी रस्त्यावर एका द्राक्ष बागेजवळ गव्याचे दर्शन झाले. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आलेली आहे. सावळजसह, डोंगरसोनीत देखील हा गवा रेडा दिसला आहे. तालुका वन विभागाचे अधिकारी- कर्मचारी सावळजकडे रवाना झाले आहेत.
सिद्धेवाडी रस्त्यावरील वसंत सावंत यांच्या द्राक्ष बागेमध्ये हा गवा मुक्तपणे वावर करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वन विभागाकडून गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा गवा जास्त नुकसानकारक ठरु शकतो. आपापल्या घरी सुरक्षित रहावे. सावळज गावामध्ये आलेला गवा भटकी माळाच्या मार्गे डोंगरसोनी परिसरात गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी लोकांकडून मिळत आहे. वन विभागाचे कर्मचारी गवा रेडा पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र गव्याचा वावर असल्याचे समजल्यामुळे सावळज परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे.