चोरट्यांच्या टोळीला आटपाडीत अटक
By Admin | Updated: September 16, 2014 23:26 IST2014-09-16T22:39:49+5:302014-09-16T23:26:44+5:30
सातजणांचा समावेश : १८ लाखांचा ऐवज जप्त

चोरट्यांच्या टोळीला आटपाडीत अटक
आटपाडी : सांगली आणि सातारा जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या चौदाजणांच्या टोळीचा आटपाडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, त्यांच्यापैकी सातजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६१० ग्रॅम सोने व दहा किलो चांदी असा सुमारे १८ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. टोळीवर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांनी दिली.
अटक केलेल्यांत म्होरक्या विनायक काकड्या काळे (रा. तडवळे, ता. खटाव), धनाजी जकिऱ्या पवार (रा. बोंबाळे, ता. खटाव), अमोल जयसिंग शिंदे व सागर जयसिंग शिंदे (दोघे रा. इडा, ता. भूम. जि. उस्मानाबाद), राजू गुलाब शेख, प्रवीणकुमार दत्ताजी काळे (दोघे रा. तडवळे, ता. खटाव) व संदेश मधुकर कदम (रा. पळशी, जि. सांगली) यांचा समावेश आहे. काकड्या काळे, रवींद्र काकड्या काळे, सचिन माळी, नागेश मोहन काळे, नागराज मोहन काळे, सिद्धेश्वर लक्ष्मण काळे, लखन पवार (सर्वजण रा. तडवळे, ता. खटाव) यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या मुंबईतील भार्इंदर येथील ‘गुरुकृपा टंच’ दुकानाचा मालक सयाजी शिवाजी काळे (मूळ गाव हिंगणे, ता. खटाव) याच्यासह चोरट्यांच्या टोळीला सराफी दुकान व श्रीमंतांच्या घरांची माहिती देणाऱ्या विजय भगवान पवार (रा. गारुडी, ता. खटाव) या मंडप व्यावसायिकालाही अटक केली आहे.
चार मे रोजी पळशी (ता. खानापूर) येथून टोळीने ४६ हजारांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणात विनायक काळे या संशयिताला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. ५ आॅक्टोबर २०१३ ला या टोळीने जांभुळणी (ता. आटपाडी) येथील महादेव राजाराम जुगदर यांच्या घरात घुसून दोन लाख १७ हजारांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विटा येथे ९ एप्रिलला आशिष अविनाश घाडगे यांच्या घराचे कुलूप तोडून ४० हजार रुपयांची चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
याशिवाय २० नोव्हेंबर २०१२ रोजी रामचंद्र यशवंत जुगदर (मूळ गाव जांभूळणी) यांचे कलेढोण येथील अमित ज्वेलर्स हे दुकान फोडून २१ लाख ६० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची कबुली या टोळीने दिली आहे. यामधील ६०० ग्रॅम सोने आणि १० किलो चांदी पोलिसांनी जप्त केली आहे. (वार्ताहर)
आणखी चोऱ्या उघडकीस येणार
वडूज येथील एका सराफ व्यावसायिकाच्या दुकानात शिरून चोरट्यांनी सोन्या-चांदीचा ऐवज ठेवलेली तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न करूनही ती न फुटल्याने चोरट्यांनी ती चक्क टेम्पोत घालून घरी नेली. ही तिजोरी चोरटे चार दिवस फोडत होते. या टोळीतील उर्वरित सातजणांना अटक केल्यावर आणखी चोऱ्या उघडकीस येतील, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. पाटील यांनी दिली.