Ganesh Chaturthi : उजव्या सोंडेच्या गणपतीच्या रथोत्सवाला तासगावात दिमाखात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:35 IST2018-09-14T16:30:58+5:302018-09-14T16:35:41+5:30
तासगावसह महाराष्ट्रातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील उजव्या सोंडेच्या गणपतीच्या 239 व्या रथोत्सवाला दुपारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. दुपारी गणेश मंदिरापासून रथोत्सवाला हजारो भाविकांच्या जनसागराच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्यासह प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री पुजन झाले. त्यानंतर रथोत्सवाला सुरुवात झाली.

Ganesh Chaturthi : उजव्या सोंडेच्या गणपतीच्या रथोत्सवाला तासगावात दिमाखात सुरुवात
तासगाव : तासगावसह महाराष्ट्रातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील उजव्या सोंडेच्या गणपतीच्या 239 व्या रथोत्सवाला दुपारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. दुपारी गणेश मंदिरापासून रथोत्सवाला हजारो भाविकांच्या जनसागराच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्यासह प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री पुजन झाले. त्यानंतर रथोत्सवाला सुरुवात झाली.
मराठा साम्राज्याचे शेवटचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी गणपतीपुळे येथील गणेशाचे दुसरे स्थान म्हणून उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची तासगाव येथे स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी दक्षिणेत रूढ रथयात्रेची संकल्पना आणली.
तीस फूट उंचीचा तीन मजली लाकडी रथ प्रतिवर्षी ऋषी पंचमी दिवशी लाखो भाविक हाताने ओढतात. 238 वर्षांपासून ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. या रथामधून बाप्पा, श्रीकाशिविश्वेश्वर यांच्या भेटीसाठी जातात. तेथून ते परत येतात. दुसऱ्या मजल्यावर "श्रीं' ची मूर्ती ठेवलेली असते. रात्री पटवर्धन राजवाड्यातील गणपतीचे विसर्जन होऊन उत्सव संपतो.
दुपारी रथोत्सवास मोठया उत्साहात सुरुवात झाली. रथ ओढण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली होती. शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मिरवणूक मार्ग भाविकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. 'गणपती बाप्पा मोरया' , 'मंगलमूर्ती मोरया', मोरया, मोरया च्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता. दर्शनासाठी भाविकांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, शुभूराजे देसाई यांच्यासह अनेकानी रथोत्सवास उपस्थिती लावली.