Video - सांगलीच्या संस्थान गणपतीची रथयात्रा, गणेश भक्तांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 21:25 IST2018-09-17T21:24:40+5:302018-09-17T21:25:32+5:30
'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष, मिरवणूक मार्गावर भाविकांची गर्दी

Video - सांगलीच्या संस्थान गणपतीची रथयात्रा, गणेश भक्तांची मोठी गर्दी
सांगली : भाविकांच्या उत्साह वर्षावात रंगलेली रथयात्रा... ढोल-ताशे, लेझीम, बॅन्ड आणि वाद्यवृंदाचा ताल... भगवे फेटे, भगवे झेंडे आणि गणपतीबाप्पा मोरयाऽऽचा जयघोष... अशा भक्तिमय वातावरणात सांगलीच्या संस्थान गणपतीला सोमवारी शाही थाटात निरोप देण्यात आला.
श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते दुपारी तीन वाजता राजवाडा परिसरातील दरबार हॉलमध्ये श्रींची आरती करण्यात आली. श्रींची विधिवत पूजा झाल्यानंतर दरबार हॉलमध्ये पान-सुपारीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पोर्णिमा पटवर्धन, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी विजय काळम- पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा आदी उपस्थित होते. पान-सुपारीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत घोडेस्वार, भालदार, चोपदार, तसेच ढोल-ताशा व ध्वजपथक, मुलींचे लेझीम पथक, हलगी पथक, सनई-चौघडा यासह गंधर्व बँड सहभागी झाला होता. रथयात्रेचा मार्ग रांगोळ्यांनी रेखाटला होता.
दुपारी सव्वाचारला रथयात्रा राजवाडा चौकात आली. तेथे काहीकाळ ती थांबविण्यात आली. त्यानंतर पटेल चौक, गणपती पेठ मार्गे मिरवणूक गणपती मंदिर येथे आल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. मिरवणुकीच्या दुतर्फा सांगलीकरांसह ग्रामीण भागातून व कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. उत्सवमूर्तीवर भाविकांकडून पेढे, फुले, गूळ, खोबरे, खजूर व प्रसादाची उधळण करण्यात येत होती.
पाहा व्हिडीओ -