सीमा लढा कृती समितीचा मोर्चा
By Admin | Updated: July 31, 2014 23:23 IST2014-07-31T22:59:26+5:302014-07-31T23:23:47+5:30
सांगलीत निदर्शने : येळ्ळूरमधील हल्ल्याचा निषेर्ध

सीमा लढा कृती समितीचा मोर्चा
सांगली : कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे ग्रामस्थांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (गुरुवार) सीमा लढा कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते बिराज साळुंखे यांनी केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या येळ्ळूर गावामध्ये कर्नाटक पोलिसांनी ग्रामस्थांवर हल्ला करुन त्यांना बेदम मारहाण केली. याच्या निषेधार्थ आज सीमा लढा कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी बिराज साळुंखे म्हणाले की, अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ फौजदारी करुन त्यांना निलंबित करण्यात यावे. संपूर्ण महाराष्ट्राने एकजुटीने येळ्ळूर ग्रामस्थांच्या पाठीमागे थांबले पाहिजे. यावेळी अॅड. अजित सूर्यवंशी, माजी आ. नितीन शिंदे, दिगंबर जाधव, नीता केळकर, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, शंभोराज काटकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
मोर्चा स्टेशन चौकातून काढण्यात आला. आंदोलनामध्ये सचिन सव्वाखंडे, उमेश देशमुख, विकास मगदूम, नगरसेविका स्वरदा केळकर, सुधीर गाडगीळ, प्रा. मोहन साबळे, रावसाहेब घेवारे, रावसाहेब खोचगे, डॉ. संजय पाटील, बजरंग पाटील, बजरंग पाटील, तेजस्विनी सूर्यवंशी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)