सांगली : पवनचक्की विक्री व्यवहारात सांगलीतील अभियंता यांची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित दत्तात्रय मुसळे आणि वैशाली दत्तात्रय मुसळे (दोघेही रा. राजश्री प्लाझा, सिनेमा टॉकीजनजीक, एलबीएस मार्ग, घाटकोपर, मुंबई) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शरद ज्ञानोबा खराडे (६३, रा. नागराज कॉलनी, विश्रामबाग) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी शरद खराडे हे सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. संशयित दत्तात्रय मुसळे व वैशाली मुसळे यांनी त्यांच्या खटाव तालुक्यातील वरुड आणि औंध येथे विनकॉन कंपनीच्या दोन पवनचक्क्या असल्याचे खराडे यांना सांगितले होते. या दोन्ही पवनचक्क्यांची विक्री व्यवहाराची रक्कम ५१ लाख रुपये इतकी निश्चित केली होती. खराडे यांनी या दोन्ही पवनचक्की खरेदी करण्यास संमती दर्शवली.मुसळे दाम्पत्याने पवनचक्की हस्तांतरणाबाबत वाद असल्याची माहिती खराडे यांच्यापासून लपवून ठेवली होती. खराडे यांनी मुसळे दाम्पत्यास ४५ लाख रुपये दिले. मार्च २०१६ ते सप्टेंबर २०१६ या दरम्यान हा प्रकार घडला. मात्र पवनचक्की हस्तांतरामध्ये वाद असल्याची माहिती मिळताच खराडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे खराडे यांनी मुसळे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. या जुन्या अर्जावरून विश्रामबाग पोलिसांनी मुसळे दाम्पत्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल केला आहे.
पवनचक्की विक्रीच्या व्यवहारात ४५ लाखांची फसवणूक, घाटकोपर येथील दाम्पत्यावर सांगलीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:14 IST