साडेपाचशे कर्मचारी जाणार निवडणुकीला
By Admin | Updated: September 21, 2014 00:44 IST2014-09-21T00:43:47+5:302014-09-21T00:44:23+5:30
महापालिका ओस : घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता विभागाच्या वसुलीवर परिणाम शक्य

साडेपाचशे कर्मचारी जाणार निवडणुकीला
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी महापालिकेच्या दीडशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यालयाने नियुक्तीपत्रे दिली आहेत. अजूनही सुमारे साडेतीनशे ते चारशे कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे मिळण्याची चिन्हे आहेत. एक महिना आता हे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त राहणार असल्याने महापालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता विभागाच्या वसुलीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा निवडणूक कार्यालयाने निवडणुकीच्या कामी महापालिकेच्या दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी नियुक्ती ठिकाणी अजून हजर झालेले नाहीत, मात्र त्यांना जावे लागणार आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत महापालिकेचे पाचशे ते सहाशे कर्मचारी नियुक्त केले जातात. त्यामुळे यंदाही तितक्याच प्रमाणावर नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे सध्या महापालिकेत पदाधिकारी, सदस्य येत नसल्याने याठिकाणी स्मशानशांतता दिसत होती. त्यातच आता अधिकारी व कर्मचारीही निवडणूक कामाला जाणार असल्याने मुख्यालयासह अन्य कार्यालये, महसुली विभाग शांत होणार आहेत.
मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त झाल्यास महापालिकेच्या करवसुलीवर याचा परिणाम निश्चितपणे होणार आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता विभागांसह अन्य महसुली विभागांची थकबाकी आता ७0 कोटींच्या घरात आहे. येत्या महिन्याभरात वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवणार आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या महापालिकेला कर्मचाऱ्यांची ही कमतरता आणखी अडचणीत ठरणार आहे. (प्रतिनिधी)