सांगली : गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील माजी सरपंच हंबीरराव जावीर हे वयाच्या ४८ वर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले. तेही ६३ टक्के गुण मिळवून. माजी सरपंच उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांच्या मित्र आणि कुटुंबीयांनी एकच जल्लोष केला. वडील उत्तीर्ण झाल्यानंतर मुलगी अंजली आणि मुलगा शुभम यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.हंबीरराव जावीर हे १९९४ मध्ये गोमेवाडी येथील गजानन हायस्कूलमध्ये दहावीला होते. काही कारणांमुळे जावीर यांना दहावीची परीक्षा देता आली नव्हती. त्यामुळे तिथेच त्यांच्या शिक्षणाला अडथळा निर्माण झाला. शिक्षण थांबल्यामुळे पुढे त्यांनी शेती आणि वाहन चालक म्हणून कामाला सुरुवात केली. हंबीरराव यांचा गावामध्ये जनसंपर्क मोठा असल्यामुळे त्यांनी गावाच्या राजकारणात सहभाग घेतला.२००७ मध्ये ते प्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. २०१० मध्ये त्यांची गावाच्या सरपंचपदी वर्णी लागली. त्यानंतर ते १५ वर्षे गावात सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय होते. यादरम्यान हंबीरराव यांचा विवाह झाला. पत्नी नंदाताई या बारावी उत्तीर्ण असून, मुलगी अंजली हिने एम.कॉम., तर मुलगा शुभम याने कायद्याची पदवी घेतली आहे.
मुलगा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. घरात सर्व उच्चशिक्षित असून, वडील दहावीही पास नाहीत, म्हणून मुलगी अंजली आणि मुलगा शुभम यांनी वडील हंबीरराव यांना दहावी परीक्षेला बसण्याची विनंती केली. त्यांच्याकडून वर्षभर अभ्यासही करून घेतला. परीक्षा झाली आणि त्यानंतर अखेर १३ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला. वडील हंबीरराव यांना दहावीला ६३ टक्के गुण मिळताच मुलांनी एकच जल्लोष केला.
वडिलांच्या परीक्षेचा तणाव मुलांनी घेतला बहुतांशवेळा मुलगा दहावी आणि बारावीला आहे म्हटले की, आई- वडील तणावात असतात; पण याठिकाणी वडिलांची दहावी परीक्षा असल्यामुळे मुलगा आणि मुलगी तणावात होते. वडील दहावी उत्तीर्ण होणार की नाही. ते अभ्यास व्यवस्थित करतात का? यासह अनेक प्रश्न मुलांना पडत होते.
शिक्षणाला वयाची अट नाही‘शिक्षणाला वयाची अट नाही’ हे विधान सत्य आहे. अनेक लोक वेगवेगळ्या वयात शिक्षण घेतात आणि शिकत राहतात. काही लोक शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेतात, तर काही जण कामादरम्यान किंवा सेवानिवृत्तीनंतर शिक्षण घेतात.