विद्यमान आमदारांनी शिराळ्यातील 'शंभू स्मारकाचा' निधी रोखल्याचा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:25 IST2025-10-26T16:25:00+5:302025-10-26T16:25:08+5:30
Sangli News: स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज यांच्या शिराळ्यातील तोरणा भुईकोट किल्ल्यावरील नियोजित स्मारकाचा निधी रोखून कामात अडथळा आणण्याचे 'पाप' विद्यमान आमदारांनी केले आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

विद्यमान आमदारांनी शिराळ्यातील 'शंभू स्मारकाचा' निधी रोखल्याचा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचा आरोप
शिराळा - स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज यांच्या शिराळ्यातील तोरणा भुईकोट किल्ल्यावरील नियोजित स्मारकाचा निधी रोखून कामात अडथळा आणण्याचे 'पाप' विद्यमान आमदारांनी केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांमार्फत गेल्या अडीच महिन्यांपासून स्मारकाचे काम हेतुपुरस्सर थांबवण्यात आले आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
जर स्मारकाचे काम ३१ तारखेपर्यंत सुरू करण्याचे आदेश मिळाले नाहीत, तर १ नोव्हेंबरपासून शिराळ्यातील शिवपुतळ्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
'हिंदुत्वाचा नारा देणाऱ्यांनीच घातला स्मारकाला खिळ'
चिखली (ता. शिराळा) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मानसिंगराव नाईक यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "विद्यमान लोकप्रतिनिधी हिंदुत्वाचा नारा देऊन निवडून आले आहेत. मात्र, तेच समस्त हिंदूंचा अभिमान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामात खिळ घालत आहेत, हे दुर्दैव आहे. जणू काही हे लोकप्रतिनिधी इतिहासातील सूर्याजी पिसाळाची भूमिका बजावत असल्याचं दिसत आहे."
झाकोळलेला इतिहास जपण्याची संकल्पना
नाईक यांनी स्मारकाच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, मुघलांनी संगमेश्वर येथे संभाजी राजांना अटक केल्यानंतर त्यांना घेऊन जात असताना, इतिहासात एकमेव शिराळ्यातच त्यांना सोडवण्याचा प्रयत्न झाला होता. हा झाकोळलेला इतिहास भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा, यासाठी मी आमदार असताना या स्मारकाची संकल्पना मांडली होती.टप्प्याटप्प्याने विकसित होणाऱ्या या स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
सध्या १३ कोटी ४६ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.यामध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळा, तसेच शिल्प चित्रांच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा जन्म ते त्यांना शिराळ्यापर्यंत कसे आणले गेले, हा संपूर्ण इतिहास मांडला जाणार आहे.शिराळकरांची ही अनेक वर्षांची मागणी होती, जी आता पूर्णत्वाच्या मार्गावर असताना अडथळे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
'निविदा मंजुरीवर दबाव, विकासकामांना विरोध'
माजी आमदार नाईक यांनी स्मारकाच्या निधी आणि कामाच्या स्थितीबद्दल माहिती दिली: राज्य शासनाकडून १३ मार्च २०२४ रोजी १३ कोटी ४६ लाख ३९ हजार ६६४ रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली.त्यापैकी ९ कोटी ८५ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली आहे. २० जून २०२५ रोजी निविदा प्रसिद्ध झाली आणि २६ ऑगस्टला ती मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे येथील मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांच्याकडे पाठवण्यात आली. नाईक यांचा आरोप आहे की, "तेव्हापासून विद्यमान लोकप्रतिनिधींनी मुख्य अभियंता रहाणे यांच्यावर दबाव टाकून निविदेस मंजुरी होऊ दिली नाही. विकास कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतात, मात्र येथील लोकप्रतिनिधी हे स्मृतीस्थळ होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत."
आंदोलनाचा इशारा
मानसिंगराव नाईक यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर 'हिंदुत्वाचे नाटक' करण्याचा आणि 'लोकांच्या भावनांशी खेळण्याचा' आरोप केला. ते म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक झाल्यास झाकोळलेला इतिहास पुढे येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार आणि रोजगार निर्मिती होऊन शिराळ्याच्या विकासात भर पडणार आहे."
या महत्त्वाच्या कामास खीळ घालणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे कार्यारंभ आदेशासाठी आंदोलन करण्याची वेळ येणे, हे दुर्देव असल्याचे सांगत दि.१ नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन व निषेध व्यक्त करण्याचा इशारा दिला.