Sangli: मांगरूळमध्ये बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 19:32 IST2025-11-18T19:30:24+5:302025-11-18T19:32:23+5:30
शिराळा तालुक्यातील मांगरूळमध्ये वनविभाग आणि 'सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स'ची यशस्वी मोहीम

Sangli: मांगरूळमध्ये बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने घेतले ताब्यात
शिराळा: शिराळा तालुक्यातील मांगरूळ येथे मंगळवारी (दि. १८) सकाळी वनविभाग आणि 'सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स'च्या पथकाने सुमारे सहा ते सात महिन्यांच्या बिबट्याच्या नर बछड्याला यशस्वीरित्या रेस्क्यू केले. हा बछडा अशक्त आणि आजारी असल्याचे आढळून आले. त्याला तातडीने उपचारासाठी पुणे येथील रेस्कु रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
चिंचेश्वर मंदिराच्या जवळच्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर आहे. मंदिराजवळ शेतकऱ्यांनी बिबट्याच्या बछड्याला पाहताच वनविभागाला माहिती दिली. तातडीने वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर आणि 'सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स'चे संस्थापक प्राणीमित्र सुशीलकुमार गायकवाड, सुभाष पाटील, मारुती पाटील, संतोष कदम, अमर पाटील, संजय पठाणकर, अक्षय ढोकळे हे घटनास्थळी पोहोचले.
पथकाचे बचावकार्य (रेस्क्यू ऑपरेशन) सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाले आणि सुमारे साडेतीन वाजेपर्यंत सुरू होते. अखेर दबा धरून बसलेल्या बछड्याला जाळी टाकून सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. बछडा अशक्त, आजारी असल्याचे आढळून आले. त्याची प्रकृती खालावल्याने प्राथमिक तपासणी व उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू केंद्रात पाठवण्यात आले आहे.