Sangli: बोरगाव परिसरातील परदेशी सारस पक्षी परतीच्या वाटेवर; पक्षी प्रेमींना भुरळ घातली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:02 IST2024-12-30T13:01:55+5:302024-12-30T13:02:08+5:30
उन्हाळ्यानंतर हिवाळ्याच्या मध्यापर्यंत कृष्णाकाठी विसावा

Sangli: बोरगाव परिसरातील परदेशी सारस पक्षी परतीच्या वाटेवर; पक्षी प्रेमींना भुरळ घातली
नितीन पाटील
बोरगाव :आपल्याकडे परदेशी पाहुणा असणारा सारस पक्षी सध्या परतीच्या वाटेवर आहे. याच सारसने मात्र बोरगाव (ता. वाळवा) व परिसरातील पक्षी प्रेमींना भुरळ घातली आहे. या सारस पक्षांचे छायाचित्र व सौंदर्य टिपण्यासाठी पक्षी प्रेमी मोठ्या प्रमाणात इथे भेट देत आहेत. गावाच्या लगत असणाऱ्या शेकडो एकर शेतीत साचलेल्या पाणी व दलदलीवर हे प्रवासी पक्षी सध्या वावरताना दिसत आहेत.
बोरगाव एसटी बसस्थानक ते बनेवाडी फाट्यापर्यंतची शेती क्षेत्र पावसाच्या साचलेल्या पाण्याने नापीक, उजाड तसेच दलदलमय बनली आहे. याच साचलेल्या पाण्यात छोटे मासे, खेकडे, जानवे, जळू, बेडूक असे अनेक जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी अनेक परदेशी पक्षी हंगामात तळ ठोकून असतात. येथे असणारा सारस पक्षी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा पक्षी दरवर्षी उन्हाळ्यानंतर आगमन करतो व हिवाळ्याच्या मध्यात येथून निघून जातो.
सध्या हिवाळ्याचा मध्यावधी कालखंड आल्याने हा पक्षी पुन्हा सातासमुद्रापलीकडे जाणार आहे. सारस पक्षी हा पांढरा शुभ्र, लांबलचक लालबुंद चोच, उंच पाय, किमान उंची १५० ते १५२ सेंटीमीटर असते. यामुळे हे सारस पक्षी परिसरातील पक्षी प्रेमींना भुरळ घालत आहे. त्याला पाहण्यासाठी येथे गर्दी ओसंडत आहे. आता या पक्षांनाही परतीचे वेध लागले आहेत. येथून हे सारस पक्षी उत्तर भारत, हिमाचल प्रदेश, नेपाळ, पाकिस्तान तसेच आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या परिसरात वास्तव्य करतात.
हे सारस पक्षी वर्षभर इथून तिथे असे स्थलांतर करत राहतात. या काळात ते कृष्णाकाठावर वास्तव्य करतात. योग्य हवामान, झाडी, पाणी व खाद्य मिळत असल्याने या परिसरात ते येत असावेत. या पक्षांच्या वास्तव्यामुळे बोरगावच्या सौंदर्यात भर घातल्याने जणू पर्यटन क्षेत्राचे स्वरूप आले आहे. - रणजीत पाटील, पक्षी निरीक्षक, बोरगाव