जिल्ह्यात अन्न व औषध विभागाचे छापे; १७ लाखांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:35 IST2020-10-30T15:31:49+5:302020-10-30T15:35:30+5:30
Diwali, Food and drug, sangli, raid बाजारपेठेला दिवाळीची चाहूल लागली असतानाच, अन्नपदार्थांत होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून भेसळीच्या संशयावरून १७ लाख ६२ हजार ७१८ रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अन्न व औषध विभागाचे छापे; १७ लाखांचा साठा जप्त
सांगली : बाजारपेठेला दिवाळीची चाहूल लागली असतानाच, अन्नपदार्थांत होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून भेसळीच्या संशयावरून १७ लाख ६२ हजार ७१८ रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
दिवाळीच्या तोंडावर अन्नपदार्थांत होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासनातर्फे कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार भेसळीच्या संशयावरून साठे अन्नपदार्थांचे साठे जप्त करण्यात आले आहेत.
यामध्ये ८ लाख २ हजार ६०० रुपये किमतीचे १० टन चना बेसन, १३ हजार १७२ रुपये किमतीची १७८ किलो साबुदाणा, २३ हजार ७४० रुपये किमतीचे ९५ किलो पनीर व खवा, ६३ हजार ९६० रुपये किमतीचा २४६ किलो भडंग, २ लाख ८० हजार ९२० रुपये किमतीचा ७ टन आटा, तीन लाख ९२ हजार ६०० रुपये किमतीचे २ टन शेंगदाणा तेल व तीळ तेल, एक लाख ८० हजार ६१४ रुपये किमतीची दोन हजार ६९९ किलो लिसा व पिसा साखर, पाच हजार ११२ रुपये किमतीचे ४० किलो सोडियम हायड्रो सल्फाईट, असा साठा जप्त केला आहे.
जिल्ह्यातील हॉटेल्स, नाष्टा सेंटर्सचीही नियमित तपासणी पथकाकडून सुरू असून त्यामध्ये स्वच्छतेचा अभाव असलेल्या व नियमांचे उल्लंघन करणार्या ५० व्यावसायिकांना दोन लाख ३६ हजार ५०० रूपये दंड करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत दुधाचे सहा, तुपाचा १, खवा २, पनीर १, आटा ५, मैदा ४, रवा ५, खाद्यतेल ७, मिठाई ४, बेसन ६, साखर पावडर १, लिसा साखर एक अशा अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही चौगुले यांनी सांगितले.