मिरजेत अॅपेक्स रुग्णालयावर अन्न व औषध विभागाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:30+5:302021-06-23T04:18:30+5:30
मिरजेतील अॅपेक्स केअर कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी तब्बल ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. महेश जाधव यास ...

मिरजेत अॅपेक्स रुग्णालयावर अन्न व औषध विभागाचा छापा
मिरजेतील अॅपेक्स केअर कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी तब्बल ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. महेश जाधव यास सदोष मनुष्य वधप्रकरणी पोलिसानी अटक केली आहे. अॅपेक्स केअर कोविड रुग्णालयास औषध विक्रीचा परवाना नसतानाही रुग्णांना सांगलीतील खासगी दुकानाच्या नावावर लाखो रुपयांची औषध विक्री केल्याचे चाैकशीत आढळले आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अॅपेक्स कोविड रुग्णालयावर छापा टाकून कोविड उपचारासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन, गोळ्या व प्रतिजैविकांचा साडेचार लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. डाॅ. जाधव याने शेकडो रेमडेसिविर इंजेक्शनही घेतली असून, या इंजेक्शन वापर किती रुग्णांवर करण्यांत आला याची तपासणी सिव्हिलच्या डाॅक्टरांची समिती करणार आहे. अॅपेक्स कोविड रुग्णालयास औषध विक्रीचा परवाना दिला नसतानाही दुसऱ्या नावाने औषध विक्री केल्याबद्दल डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यांत येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डाॅ. जाधव याने कोविड रुग्णांवर उपचार करताना अनेक गैरप्रकार केल्याचे उघड होत असल्याने डाॅ. जाधव याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासनाने उपचारासाठी अन्य सुविधा नसतानाही डॉ. महेश जाधव यास कोविड रुग्णालय सुरू करण्याची दिलेली परवानगी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डाॅ. जाधव याने आर्थिक फायद्यासाठी रुग्णांच्या जिवाशी खेळ केल्याने मोठ्या संख्येने कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचे चाैकशीत स्पष्ट होत आहे.