सांगलीतील जत तालुक्यात चारा टंचाई; दर भिडला गगनाला, शेतकऱ्यांना पशुधनासाठी कसरत करावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 17:43 IST2023-04-11T17:43:00+5:302023-04-11T17:43:16+5:30
जनावरे जगविणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांची कसरत

सांगलीतील जत तालुक्यात चारा टंचाई; दर भिडला गगनाला, शेतकऱ्यांना पशुधनासाठी कसरत करावी लागणार
दरीबडची : कमी झालेली ज्वारीची पेरणी, पावसाअभावी वाया गेलेला खरीप हंगाम यामुळे जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. वैरणीचा दर गगनाला भिडला आहे. कडबा पेंडीचा दर १८ ते २२ रुपये आहे. हा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे.
तालुक्यात शेती व्यवसायाबरोबरच शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. तालुक्यात गाई व बैल ७० हजार ९१६, म्हशी ७० हजार ५८, शेळ्या ४५ हजार ९६४, मेंढ्या एक लाख ६२ हजार ८७७ अशी एकूण तीन लाख ४९ हजार ८९५ जनावरे आहेत. या जनावरांना पाच लाख ५१ हजार ९९७ मेट्रिक टन चारा आवश्यक आहे.
सध्याच्या घडीला तीन लाख सात हजार इतका चारा शिल्लक आहे. सध्या ज्वारीच्या वैरणीच्या दरात वाढ झाली आहे. पेंडीचा दर १८ ते २२ रुपये आहे. या दराने कडबा घेऊन जनावरे जगविणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांची कसरत सुरु आहे.
दुभती जनावरे संकटात
पाण्याअभावी शेतात ओला चारा नसल्याने दुभती जनावरे संकटात सापडली आहेत. चाऱ्याअभावी दुधाच्या प्रमाणात घट झाली आहे. दूध संकलन कमी झाले आहे.
शेतकऱ्यांना जनावरे जगविणे अवघड झाले आहे. विकतचा कडबा घेऊन जनावरे जगविण्याशिवाय पर्याय नाही. याचा आर्थिक भुर्दंडही बसत आहे. - विठ्ठल पाटील, पशुपालक
गेल्या चार वर्षांतील कडब्याच्या किमती
वर्ष - एका पेंडीची किंमत
२०१९ - १७ ते २१ रुपये
२०२० - ७ ते १०
२०२१ - ६ ते ९
२०२२ - १० ते १३
२०२३ - १८ ते २२ रुपये उच्चांकी