पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांनी घेतला स्वयंशिस्तीचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:23+5:302021-08-15T04:27:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शरद जाधव भिलवडी : नेहमीच येतो पावसाळा याप्रमाणे नेहमीच येतो महापूर अशी काहीशी स्थिती पलूस तालुक्यातील ...

Flood victims in Palus taluka learn a lesson of self-discipline | पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांनी घेतला स्वयंशिस्तीचा धडा

पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांनी घेतला स्वयंशिस्तीचा धडा

लोकमत न्यूज नेटवर्क

शरद जाधव

भिलवडी : नेहमीच येतो पावसाळा याप्रमाणे नेहमीच येतो महापूर अशी काहीशी स्थिती पलूस तालुक्यातील कृष्णाकाठच्या गावांची झाली आहे. २००५, २००६, २०१९, २०२१ असा चारवेळा महापूर आला. २०१९मधील महापुराच्या अनुभवातून यंदाच्या संकटात ‘मी आणि माझे कुटुंब’ असा विचार करत अनेक गावकऱ्यांनी शासकीय मदतीची प्रत्यक्ष वाट न पाहता स्वत:हून परिस्थिती सावरली आहे, असे चित्र परिसरात दिसून येत आहे.

तालुक्यातील भिलवडी, भुवनेश्वरवाडी, धनगाव, अंकलखोप, नागठाणे, संतगाव, सूर्यगाव, आमणापूर, चोपडेवाडी, सुखवाडी, खटाव, ब्रह्मनाळ, वसगडे, माळवाडी, बुर्ली, नागराळे, दुढोंडी, पुणदी, पुणदीवाडी, घोगाव, तुपारी, दह्यारी आदी गावांना नेहमीच पुराचा फटका बसतो. गावाला पाण्याचा वेढा पडला की, वाचवता येईल तेवढे साहित्य, धनधान्य सुरक्षित ठेवून ग्रामस्थांना जनावरांसह स्थलांतर करावे लागते. पूर ओसरल्यानंतर परत गावी जाणे. येथे आल्यावर घरे, जनावरांचे गोठे, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करुन जनजीवन पूर्वपदावर आणणे ही कसरत आता अंगवळणी पडत आहे.

पूरग्रस्त गावातील रस्ते, गटारे, वीज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर ओसरताच सुरू झाली. ज्या घरांची पडझड झाली आहे, तेथील नागरिकांनी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. कोरोनाच्या दोन लाटा व महापुरामुळे मोठे नुकसान झालेल्या व्यापारीवर्गाने दुकाने सुरू ठेवली असली तरीही ग्राहकांकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही, हे येथील व्यापाऱ्यांचे दुखणे आहे.

सोयाबीन, भुईमूग आदी खरीप पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुरातून वाचलेल्या क्षेत्रातून काही तरी हाती लागेल, या अपेक्षेने अद्याप सोयाबीनची काही ठिकाणी काढणी व मळणी सुरू आहे.

कोट

वारंवार येणाऱ्या महापुरात कृष्णाकाठचा शेतकरी व शेती उद्योग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून शेती आणि शेतकरी वाचेल, अशी ठोस मदत जाहीर करावी.

- संजय कदम, शेतकरी, भिलवडी

कोट

भिलवडी ही पलूस तालुक्यातील कृष्णाकाठची महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. प्रत्येकवेळी फर्निचरसह दुकानातील साहित्य हलवायचे, ते परत आणायचे, स्वच्छता करायची. पडझड झाली की दुरुस्ती करावी लागते. यासाठी खर्च व होणारा मानसिक त्रास बघता मिळणारी मदत अत्यल्प आहे.

- रमेश पाटील, अध्यक्ष, व्यापारी संघटना, भिलवडी.

140821\img_20210814_124428.jpg

भिलवडी मुख्य रस्त्यालगत असणारे प्रवेशद्वार ग्रामपंचायत व हनुमान मंदिराजवळील परिसर

Web Title: Flood victims in Palus taluka learn a lesson of self-discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.