पहिल्या महिला सायबर कमांडो सांगलीत कार्यरत, देशभरातील पहिली बॅच प्रशिक्षित
By घनशाम नवाथे | Updated: May 15, 2025 16:50 IST2025-05-15T16:49:59+5:302025-05-15T16:50:34+5:30
सायबर हल्ले परतवण्यासाठी सज्ज

पहिल्या महिला सायबर कमांडो सांगलीत कार्यरत, देशभरातील पहिली बॅच प्रशिक्षित
घनशाम नवाथे
सांगली : ज्याप्रमाणे दहशतवाद्यांना प्रतिकार करण्यासाठी सैन्य दलातील ‘कमांडो’ मोहीम राबवतात, त्याचप्रमाणे अलीकडे सायबर हल्ले रोखण्यासाठी ‘सायबर कमांडो’ सज्ज झाले आहेत. देशभरातून २४७ ‘कमांडो’ ची पहिली बॅच प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली आहे. महाराष्ट्रात ९ सायबर कमांडो कार्यरत आहेत. त्यापैकी सांगलीतील सायबर पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक रूपाली बोबडे या महाराष्ट्रातील पहिल्या सायबर कमांडो ठरल्या आहेत.
ज्याप्रमाणे दहशतवादी एखादे ‘टार्गेट’ ठेवून घुसखोरी करून त्यांचा हेतू साध्य करतात, त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात सायबर हल्लेखोरही संगणक नेटवर्कमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करतात. दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सैन्य दलात विशेष प्रशिक्षण दिलेले ‘कमांडो’ कार्यरत असतात. ठराविक वेळेत ते मोहीम फत्ते करतात, परंतु सायबर हल्ले परतवण्यासाठी तज्ज्ञ मंडळींची अनेकदा कमतरता भासते. ही गरज लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘इंडियन सायबर कमांडो’ ही संकल्पना अंमलात आणली.
सायबर कमांडोचे प्रशिक्षण घेण्यासाठी पोलिस दलातील तज्ज्ञांना आवाहन केले होते. त्यासाठी एकाच दिवशी देशपातळीवर परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना ‘आयआयटी’, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी सारख्या नामांकित संस्थामध्ये प्रशिक्षणासाठी निवड केली. देशभरातून २४७ जणांची ‘सायबर कमांडो’ प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील ९ जणांचा समावेश होता.
महाराष्ट्रातील नऊ जणांमध्ये एकमेव महिला अधिकारी रूपाली बोबडे यांचा समावेश आहे.
आयआयटी मद्रास येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रूपाली बोबडे या पहिल्या महिला सायबर कमांडो ठरल्या आहेत. त्या मूळच्या नाशिक येथील आहेत. २०१२ मध्ये त्या उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात रूजू झाल्या आहेत.
यापूर्वी महाराष्ट्र सायबर सेल मुंबई या नोडल ऑफिसमध्ये त्यांनी सात वर्षे काम केले आहे. त्या सायबर तज्ज्ञ आहेत. सांगलीत सायबर पोलिस ठाण्याकडे नियुक्त असताना, त्यांनी ‘कमांडो’ म्हणून नुकतेच त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे सहकारी शैलेश साळुंखे, विवेक सावंतही यांनीही त्यांच्याबरोबर प्रशिक्षण घेतले.
सायबर कमांडो म्हणून जबाबदारी
सहा महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये सायबर सिक्युरिटी, सायबर हल्ले रोखण्यासाठी कसा प्रतिबंध करायचा, सायबर गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना, गुन्हे उघडकीस आणणे आदींचे परिपूर्ण प्रशिक्षण दिले आहे. आर्थिक फसवणुकीचे गुन्हे रोखण्यासाठी जागृती करण्याची जबाबदारी सायबर कमांडोंवर राहणार आहे.
पाच हजार सायबर कमांडो प्रशिक्षित करणार
ज्याप्रमाणे सैन्य दल सज्ज आहे, त्याच धर्तीवर सायबर क्षेत्र सुरक्षित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाच वर्षांत पाच हजार सायबर कमांडो प्रशिक्षित करण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्यापैकी २४७ जणांची पहिली बॅच प्रशिक्षित झाली आहे.
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनी फसवणूक करत आहेत. ऑनलाइन व्यवहार करताना प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. सायबर सेलकडून जागृती केली जात आहे. देशभरातील सायबर हल्ले परतवून लावण्यासाठी कमांडो यापुढे सदैव सज्ज असतील. - रूपाली बाेबडे, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.