आग विझली... पण धग कायम!

By Admin | Updated: January 29, 2015 00:09 IST2015-01-28T23:10:21+5:302015-01-29T00:09:52+5:30

असुरक्षित बंदर : सुदैवाने मोठी हानी टळली, आगीत अनेकांची स्वप्ने अन् चेहऱ्यावरचे हसूही जळले

Fire extinguished ... but the fire continued! | आग विझली... पण धग कायम!

आग विझली... पण धग कायम!

शिवाजी गोरे - दापोली --हर्णै बंदरात मंगळवारी लागलेल्या आगीची तीव्रता कमी झाली, आगीचे लोळ कमी झाले, आग विझली. मात्र, आगीत जळून खाक झालेल्या मच्छिमार बांधवांच्या संसाराची धग मात्र अजूनही कायम आहे. आग कशामुळे लागली, यापेक्षा बंदर किती असुरक्षित आहे, हेच प्रकर्षाने दिसून आले.
मंगळवारी लागलेल्या आगीत जीवितहानी झालेली नाही म्हणून जेटीकडे दुर्लक्षही करुन चालणार नाही. आता आग विझली, बंदर पुन्हा सुरु झाले. परंतु लागलेल्या आगीच्या दूरगामी परिणामांची झळ बसलेल्या कुटुंबांच्या अंत:करणात आगीची धग घर करुन बसली आहे.
हर्णै बंदरात लागलेल्या आगीमुळे जेटीचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. कालच्या लागलेल्या आगीमुळे मच्छिमार बांधव बरंच काही शिकून गेले. त्या आगीची तीव्रताही त्यांना चांगलीच जाणवली. आग विझली. मात्र, बंदरातील सुरक्षितेचे काय? हा विचार जरी मनात आणला, तरी जीवाचा थरकाप होतो. कारण ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या शेजारीच मच्छिमार सोसायटीचे डिझेल टँकर होते. बंदरात मासे खरेदीसाठी आलेल्या लोकांच्या गाड्या होत्या एखाद्या गाडीने चुकून पेट घेतला असता तर त्याचे भयंकर परिणाम झाले असते. बंदराशेजारी अनेक घरेसुद्धा आहेत. समुद्रकिनाऱ्यावर ठेवण्यात आलेल्या मासेमारी बोटीला आग लागली. आग एवढी गंभीर होती की, त्या आगीला सहज आटोक्यात आणणे शक्य नव्हते. परंतु मंगळवारी रात्री समुद्रावर वारा नसल्यामुळे आग आटोक्यात आणणे शक्य झाले. हर्णै बंदरातील लागलेल्या आगीत पुन्हा एखादे बंदर असुरक्षित असल्याचे दिसून आले.
हर्णै बंदरात समुद्र किनाऱ्यावर मच्छी खरेदी - विक्रीचे सेंटर आहे. गरीब मच्छिमार बांधवांनी नारळाच्या झापापासून तयार केलेले झोपडे आहे. उदरनिर्वाहाच्या साधनासाठी तयार केलेले छोटेसे झोपडे जीवावर बेतू नये, हीच अपेक्षा येथील मच्छिमार व्यक्त करत आहेत.
हर्णै बंदरातील आगीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे आढळून आले. आग लागल्यानंतर तब्बल तीन तासांनी खेड नगरपालिकेचा बंब आला. उशिरा का होईना आगीचा बंब घटनास्थळी दाखल झला. परंतु दापोली तालुक्यात आग विझवण्यासाठी एकही बंब असू नये, यासारखी दुर्दैवी बाब काय असू शकते. कालची आग आटोक्यात आली नसती, तर प्रशासनाने राखरांगोळी झाल्यावर येऊन काय केले असते, अशा संतप्त भावना मच्छिमारांनी व्यक्त केल्या.
अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण मासेमारी व्यवसायाकडे वळले आहेत. पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. परंतु शासनाकडून त्यांना कसल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. मासेमारी व्यवसायातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल दिला जातो. कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारे मच्छिमारी बंदर अद्यापही शासन दरबारी दुर्लक्षित आहे.
हर्णै बंदरातील लिलावात मासे खरेदी करायचे व आपल्या झोपडीवजा सेंटरमध्ये ठेवून आजूबाजूच्या गावात किंवा मच्छी मार्केटमध्ये जाऊन विकून उदरनिर्वाह करण्याचा मच्छिमार महिलांचा दिनक्रम आहे. डोक्यावर छतच नाही. हातात बळ नाही. मासे विक्रेत्यांचे माशांचे पैसे द्यायचे आहेत, अशा परिस्थितीत पुन्हा संसार कसा थाटायचा, हीच चिंता मच्छिमार महिलांना भेडसावत आहे.
मासे विक्रीवर आमचे पोट होते. कालच्या आगीत सगळंच जळून खाक झालं. आता जीवन कसं जगायचं, हा गंभीर प्रश्न आपल्या कुटुंबासमोर आहे. आमची बोट नाही. पोटासाठी मासे विक्री करतो. त्यातून चार पैसे येतात, त्यावरच पोट आहे. मात्र, सेंटरला लागलेल्या आगीमुळे खरेदी केलेले मासे, काही साहित्य व सेंटरमधील काही रक्कम जळून गेले, त्या मच्छिमारांनी जगायचे कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.

मच्छिमार बांधवांचे तळहातावरचे पोट आहे. बंदरात मासे विकत घ्यायचे. आपल्या मच्छिमार सेंटरमध्ये ठेवायचे व त्यातून मिळणाऱ्या चार पैशांतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, असाच आमचा दिनक्रम असतो. २६ जानेवारीनिमित्त दापोली तालुक्यात पर्यटक आले होते. त्यामुळे ५० हजार, तर कोणी १ लाख रुपयांची मच्छी खरेदी केली होती.
- मनीषा वाघे, मच्छी व्यावसायिक

हर्णै बंदरात लागलेल्या आगीमुळे आमचा संसारच जळून खाक झालाय. आता जीवनात खडतर प्रवास सुरु झाला. मासे विकून पोट भरत होतो. आता सर्वच जळून गेल्याने बिकट परिस्थिती ओढवली आहे.
- कलावती वाघे, मच्छी विक्रेती

शासनाने हर्णे बंदरात जेटी करावी म्हणून वारंवार लोकमतकडून पाठपुरावा केला जात आहे. लोकमतने यापूर्वी हर्णे बंदरातील जेटी समस्यावर वारंवार प्रकाशझोत टाकला होता. हर्णे बंदरातील जेटीचा प्रश्न शासन दरबारी गेली २० वर्षे प्रलंबित आहे. हर्णे बंदरात जेटी असती तर हा प्रश्न उद्भवला नसता असे म्हटले जात आहे.

Web Title: Fire extinguished ... but the fire continued!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.