अखेर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ--लोकमतचा दणका
By Admin | Updated: September 16, 2014 23:51 IST2014-09-16T22:56:05+5:302014-09-16T23:51:33+5:30
जिल्हा बँकेला जाग : जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, तालुक्यात समाधान

अखेर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ--लोकमतचा दणका
दरीबडची : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या अनागोंदी कारभारामुळे व महसूल विभागाच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील शेतकरी पीक विम्याला १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देऊनसुद्धा पीक विम्यापासून वंचित राहिले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विम्याच्या मुदतवाढीचा मुख्य शाखेकडून अध्यादेश आला नाही, असे कारण दाखवून पीक विमा भरून घेतला नाही. याबाबत ‘लोकमत’मध्ये १९ आॅगस्ट रोजी ‘पीक विम्यापासून शेतकरी वंचितच!’ ही बातमी प्रसिद्ध झाली होती.
याची दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी बॅँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर बॅँकेने दरीबडची येथील शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करून ८ शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेतला आहे. ‘लोकमत’मुळे न्याय मिळाला आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजनेत प्रतिहेक्टर बाजरीसाठी २२४ रुपये, मूगसाठी ३०२ रुपये, भुईमूगसाठी ८३३ बँकेत भरायचे होते. पीक विम्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. शेतकरी व राजकीय नेत्यांनी पीक विम्याला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. काही भागामध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे शासनाने १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेने सर्व शाखांना पीक विम्याला मुदतवाढ मिळाल्याचे पत्र दिले होते. तसेच १ आॅगस्टनंतर पेरणी झाली आहे, असा तलाठी यांचा दाखला अनिवार्य केला होता. परंतु अनेक गावांमध्ये तलाठ्यांनी दाखला न दिल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता आले नव्हते.
मुदतवाढ दिल्यानंतर जालिहाळ खुर्द येथील शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी कागदपत्रांसह गेले असता जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या दरीबडची शाखेने पीक विमा भरून घ्यायला नकार दिला. ‘पीक विम्यापासून शेतकरी वंचितच!’ ही बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कुशवाह यांची भेट घेतली. त्यानंतर कुशवाह यांनी प्रशासकीय अधिकारी शैलेश कोतमिरे यांना चौकशीचे आदेश दिले. कोतमिरे यांच्याशीही शेतकऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर भीमराव माने, सुमन माने, बाळू सूर्यवंशी, तम्मा चव्हाण, वसंत चव्हाण, मनोहर चव्हाण, रामा सूर्यवंशी, भीमा सूर्यवंशी शेतकऱ्यांचा विमा बँकेने भरून घेतला. (वार्ताहर)
‘लोकमत’च्या बातमीमुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. आम्ही बॅँकेला दोनवेळा विनंती करून सुद्धा विम्याची रक्कम भरून घेतली नाही. बॅँकेच्या आडमुठेपणामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागले आहे. याची चौकशी होऊन कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.
- भीमराव माने,
वंचित शेतकरी