कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळी नदीवरील सर्जापूर येथे महसूल विभागाच्या पथकाने छापा टाकून बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांवर वाहनांवर कारवाई केली. यामध्ये पन्नास ब्रास वाळूसह वाहने जप्त केली. सर्जापूर हद्दीत कुडाळी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला समजली. त्यानुसार निवासी नायब तहसीलदार सुरेश शिंगटे यांनी एक पथक सोबत घेऊन शुक्रवारी सकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पन्नास ब्रास वाळूचे अवैध उत्खनन केल्याचे उघड झाले. या वाळूसह एक पोकलॅण्ड, दोन डंपर, दोन ट्रक, दोन ट्रॅक्टर व ट्रॉली अशी वाहने जप्त करण्यात आले. जप्त केलेली वाहने मेढा पोलीस ठाण्यात जमा केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईत नायब तहसीलदारांसह मंडलाधिकारी एस. एस. साळुंखे, सर्जापूरचे तलाठी जी. जी. साळुंखे, कुडाळचे तलाठी व्ही. डी. पिसाळ, व्ही. टी. घोरपडे, एस. व्ही. ढाकणे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
जावळी तालुक्यात पन्नास ब्रास वाळू जप्त
By admin | Updated: December 19, 2015 01:05 IST