Sangli: झोपडीत शिरुन वन्यप्राण्याचा ऊसतोड मजूर महिलेवर हल्ला, गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:36 IST2024-12-24T16:33:57+5:302024-12-24T16:36:52+5:30
प्रताप महाडिक कडेगाव : वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात ऊसतोड मजूर महिला गंभीर जखमी झाली. लिंबाबाई रोहिदास राठोड (वय ४५, रा. बीबी. ...

Sangli: झोपडीत शिरुन वन्यप्राण्याचा ऊसतोड मजूर महिलेवर हल्ला, गंभीर जखमी
प्रताप महाडिक
कडेगाव : वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात ऊसतोड मजूर महिला गंभीर जखमी झाली. लिंबाबाई रोहिदास राठोड (वय ४५, रा. बीबी. ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) असे जखमीचे नाव आहे. उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेवरी ता. कडेगाव येथे आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवरी येथे हिंगणगादे रस्त्यावर क्रांती सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड मजूर टोळी खोपटे घालून राहते. लिंबाबाई राठोड खोपटीत झोपलेल्या असतानाच वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्या ओरडल्याने पती रोहिदास जागे झाले अन् त्याला लाथ घातली. अंगावर पांघरूण असल्यामुळे त्याची पकड सुटल्याने ते पळून गेले. जखमी लिंबाबाई यांना त्वरीत सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.
याबाबतची माहिती नेवरी येथील ग्रामस्थांनी कडेगावचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसेटवार यांना दिली. त्यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी परिसरात तरसाचे ठसे आढळून आले. याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे कळवली.