कोरोना बूस्टर डोस नोंदणीच्या नावाखाली फसवणुकीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 19:11 IST2022-01-17T19:06:07+5:302022-01-17T19:11:57+5:30

बूस्टर डोसच्या नावाखाली कोणी ओटीपी मागत असल्यास ही माहिती देऊ नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Fear of fraud under the guise of corona booster dose registration | कोरोना बूस्टर डोस नोंदणीच्या नावाखाली फसवणुकीची भीती

कोरोना बूस्टर डोस नोंदणीच्या नावाखाली फसवणुकीची भीती

शरद जाधव

सांगली : शासनाने सुरू केलेल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसच्या नोंदणीच्या नावाखाली नागरिकांची फसवणुकीचीच शक्यता अधिक आहे. शासनाने पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर व व्याधीग्रस्तांना डोसचे नियोजन केले असताना काहींना नोंदणीसाठी कॉल करून पाठविलेला ओटीपी मागून त्याद्वारे फसवणुकीची शक्यता असल्याने बूस्टर डोसच्या नावाखाली कोणी ओटीपी मागत असल्यास ही माहिती देऊ नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

केंद्र सरकारच्यावतीने कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता तिसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी १० जानेवारीपासून डोस देण्यास सुरुवातही झाली आहे. शासनानेच घोषित केल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर व ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना डोस देण्यात येणार आहे. याशिवाय दुसरा डोस घेतल्यापासून ९ महिन्यांनंतरच हा बूस्टर डोस घेता येणार आहे.

असे असलेतरी ऑनलाईन फसवणुकीसाठी सध्या काहीजणांना ओटीपी पाठविण्यात येत असून, त्यानंतर कॉल करून तो ओटीपी मागण्यात येत आहे. मुळात सर्वच नागरिकांना अद्याप बूस्टर डोस सुरूच झाला नसल्याने या नोंदणीस काहीही अर्थ नाही. तरीही ओटीपी घेऊन त्या व्यक्तीच्या बँक खात्यासह इतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याचीच शक्यता अधिक आहे.

पोलिसांची सतर्कता

नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मीडियासह सर्वच माध्यमातून ओटीपी कोणी मागितल्यास देण्यात येऊ नये व अनोळखी क्रमांकावरून लिंक आल्यास त्यावर ‘क्लीक’ करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

बूस्टर डोससाठी कोणतीही नोंदणी सुरू नसल्याने अनोळखी क्रमांकावरून कोणाला ओटीपीसाठी संपर्क साधल्यास आपली माहिती देऊ नये. अनोळखी व्यक्तींना आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये. - दत्तात्रय कोळेकर, सहा. पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

Web Title: Fear of fraud under the guise of corona booster dose registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.