‘शक्तिपीठ’च्या प्रतिकृतीची शेतकऱ्यांकडून होळी

By अशोक डोंबाळे | Updated: March 14, 2025 18:27 IST2025-03-14T18:27:02+5:302025-03-14T18:27:19+5:30

महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीकडून आंदोलन : शासनाविरोधात जोरदार घोषणा

Farmers celebrate Holi with a replica of Shaktipeeth highway | ‘शक्तिपीठ’च्या प्रतिकृतीची शेतकऱ्यांकडून होळी

‘शक्तिपीठ’च्या प्रतिकृतीची शेतकऱ्यांकडून होळी

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शेतकऱ्यांचा विरोध असतानाही राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची गुरुवारी सांगलीतील शेतकऱ्यांनी होळी केली. तसेच राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. महामार्गाला आम्ही जमीन देणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही शेतकऱ्यांनी सांगितली.

शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीचे नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील आदींच्या नेतृत्वाखाली सांगलीत आंदोलन करण्यात आले.
उमेश देशमुख म्हणाले, आम्ही होळीनिमित्त सण साजरा करण्याचे ठरवले होते. पण ती होळी आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निषेधाची. मुंबईत हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. विरोधी पक्षांनी शक्तिपीठ महामार्गावर स्थगन प्रस्तावही आणला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला आग्रह सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पुढे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या घरादारावरून नांगर फिरवणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची होळी करून होळी साजरी केली आहे.

शक्तिपीठ महामार्ग रद्दशिवाय थांबणार नाही : महेश खराडे
शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना नको असून हा महामार्ग अनेक देवस्थानाजवळूनही जात नाही. सध्या रत्नागिरी ते नागपूर महामार्ग शक्तिपीठ महामार्गाच्या जवळूनच जात आहे. असे असताना शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी मुख्यमंत्री फडणवीस हट्ट का धरत आहेत, असा सवाल स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी उपस्थित केला.

Web Title: Farmers celebrate Holi with a replica of Shaktipeeth highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.